
उपनगरांमध्ये दर्शनासाठी भाविकाची गर्दी
भोसरी, ता. १ ः येथील गावठाणातील लांडगे आळीतील महादेव मंदिरात लघुरुद्र पूजा, होमहवन, भजन, शेजारती आदी विधीवत कार्यक्रमांनी महाशिवरात्री उत्साहात साजरी झाली. भाविकांनी पहाटेपासून महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती.
शिवरात्रीनिमित्त महादेवाचे मंदिर फुलांनी सजविले होते. त्याचप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाईही केली होती. सोमवारी (ता. २८) सायंकाळी मंदिरात लघुरुद्र पूजा झाली. यावेळी महिला भजनी मंडळाचे भजन झाले. मंगळवारी (ता. १) होमहवन पूजा करण्यात आली. पहाटेपासूनच नागरिकांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी केली होती. विविध पूजेचे साहित्य विक्रेत्यांनी मंदिराबाहेर दुकाने थाटली होती. यामुळे परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. भाविकांना उपवासाची खिचडी आणि उसाचा रस वाटण्यात आला. रात्री नामस्मरण भजनी मंडळाचे भजन झाले. भामाबाई भागूजी लांडगे यांनी मंदिराची व्यवस्था पाहिली.
आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक रवी लांडगे, संतोष लोंढे, भीमाबाई फुगे, अनुराधा गोफणे, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, दत्ता गव्हाणे,विराज लांडे, विनय लांडगे, अशोक पठारे आदींसह भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले.