पदाधिकाऱ्यांच्या मनमानीला आयुक्तांचा चाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदाधिकाऱ्यांच्या मनमानीला आयुक्तांचा चाप
पदाधिकाऱ्यांच्या मनमानीला आयुक्तांचा चाप

पदाधिकाऱ्यांच्या मनमानीला आयुक्तांचा चाप

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ ः नगरसेवक झालो अथवा महापालिकेत किंवा प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्य झालो की, आपणच त्याचे मालक अशा अविर्भावात काही जण वागत असतात. आपल्या घरातील, कुटुंबातील, भावकीतील, नात्यातील, प्रभागातील व्यक्तींची नावे रस्त्यांना वा सार्वजनिक नावांना सूचवत असतात. अगोदर दिलेली नावेही अनेकदा बदलली जातात, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिका मिळकतींच्या नामकरणाची नियमावलीच प्रशासनाने तयार केली आहे. त्याबाबतचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिला असून त्यानुसार कार्यवाही करण्याचे सूचविले आहे.
महापालिका क्षेत्रातील रस्ते व सार्वजनिक जागांच्या नामकरणाचा ठराव सर्वसाधरण सभेने जानेवारी १९९८ मध्ये मंजूर केला आहे. त्यानुसार नामकरणे केली आहेत. क्षेत्रीय (प्रभाग) कार्यालयांच्या क्षेत्रावर तसे अधिकार दिलेले आहेत. मात्र, प्रभाग समित्यांमार्फत रस्ते व सार्वजनिक जागांना दिलेल्या नावांमध्ये बदल करून नवीन नावे दिले जात असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे नामकरणाबाबतचे धोरण निश्चित होईपर्यंत नामकरण कार्यवाहीस गेल्या वर्षी जानेवारीमध्ये स्थगिती दिली होती. अखेर गेल्या १० फेब्रुवारी रोजी उपमहापौर व महापालिका अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करून नामकरणाबाबत शिफारशी मागितल्या होत्या. त्या मिळाल्यानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली त्या शिफारशींनुसार कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कार्यवाही करण्याचा आदेश आयुक्तांनी क्षेत्रीय कार्यलयांना दिला आहे.

नामकरणाबाबत शिफारशी
- प्रभाग समिती अथवा महापालिका ठरावाने दिलेल्या नावांमध्ये बदल करू नये
- क्रीडा विषयक वास्तूंना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त खेळाडूंची नावे द्यावीत
- शिक्षण विषयक वास्तूंना शैक्षणिक क्षेत्रात योगदान असलेल्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त केलेल्यांची नावे द्यावीत
- कला, नृत्य अशा क्षेत्रांशी संबंधितांची नावे त्या-त्या क्षेत्राशी संबंधित वास्तूंना द्यावीत
- रस्ते, चौक, पुलांना महापुरुष, साधु, संत, राजांची नावे द्यावीत; पण, एकच नाव दोन ठिकाणी नसावे

अशीही उदाहरणे
- पुणे-नाशिक महामार्गावरील देहू-आळंदी रस्त्याला जोडणाऱ्या मोशीतील एकाच चौकाला दोन नावे दिली आहेत. एक फलक महापुरुषांच्या नावाचा आणि दुसरा फलक स्थानिक आडनावाचा आहे.
- महापालिकेने नामकरणानंतरचे फलक विशिष्ट रंगात लावले आहेत. मात्र, काही जण आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या पक्षाच्या रंगाशी साधर्म्य असलेल्या रंगांचा वापर केला आहे.
- महापालिकेने नामकरण केलेल्या नावाचेच फलक काहींना स्वतःच्या आवडीनुसार तयार करून लावले असून त्यावर सौजन्य म्हणून स्वतःचेच नाव टाकले आहे.