झाले नाही अपहरण पैसे गेले विनाकारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झाले नाही अपहरण
पैसे गेले विनाकारण
झाले नाही अपहरण पैसे गेले विनाकारण

झाले नाही अपहरण पैसे गेले विनाकारण

sakal_logo
By

दूरचित्रवाणीवरील गुन्हेविषयक मालिका बघण्याचं व्यसनच बबनला लागलं होतं. त्यामुळं आपले व आपल्या कुटुंबीयातील एखाद्या सदस्याचे अपहरण झाले असून, पाच लाखांची खंडणी मागितल्याचे स्वप्न त्याला नेहमी पडायचे. यातून आपल्याला मोठी प्रसिद्धी मिळाल्याचं पाहून, स्वारी खुदकन हसायची. आपलं अपहरण झालं तर लाख, दोन लाख रुपये घरात असावेत, याचीही त्याने तजवीज केली होती. मात्र, तीन- चार वर्षांत कोणत्याही चोरानं त्याच्याकडं ढुंकूनही पाहिलं नव्हतं. ‘अपहरण करणे आहे,’ अशी जाहिरात आपण द्यावी काय? असा विचारही त्याच्या मनात यायचा. पैसेवाल्यांचंच अपहरण होतं, याची माहिती त्याला होती. त्यामुळे आपल्याकडं भरपूर पैसे पडून आहेत. दोन- तीन बंगले आहेत, भरपूर जमीन- जुमला आहे, असं तो कोणीही न विचारता सांगू लागला. आपल्याविषयीची माहिती चोरांना समजावी, हा त्यामागील त्याचा उद्देश होता. मात्र, यामुळे त्याची ‘बढायाखोर माणूस’ अशी ओळख झाली. नातेवाईक व मित्रमंडळीही त्याला टाळू लागली.
`चोरांनी तुझं अपहरण केलं तर काय मजा येईल ना!’, असं तो एकदा बायकोला म्हणाला. त्यानंतर पुढचं त्याला काही आठवत नव्हतं. दोन दिवसांनी डोळे उघडल्यानंतर आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्याचे पाहून त्याला धक्का बसला. डोक्याला, हाताला व पायाला प्लॅस्टर गुंडाळलं होतं. बबनने काय झालं असावं, याचा अंदाज बांधला. त्यानंतर त्याने कधीच बायकोसमोर अपहरणाचा विषय काढला नाही.
मात्र, पुढच्या महिन्यांत बबनला फोन आला. `तुमचा मुलगा आमच्याकडे आहे. पंधरा हजार रुपये आणा आणि त्याला घेऊन जा’ अशी मागणी पलीकडून झाली. हा फोन ऐकताच बबनला अतिशय आनंद झाला पण फक्त पंधरा हजारांची मागणी ऐकून, हे चोर फारच भुरटे असावेत, अशी शंका त्याला आली.
‘‘हमे क्या भिकारी समजा है क्या? इतना कम पैसा क्यों मागता है?’’ बबनने हिंदीचा आधार घेत संवाद साधला. अपहरणकर्त्यांशी हिंदीतच बोलायचं असतं, हे त्याने अनेक चित्रपटांमध्ये पाहिले होते.
‘‘ए वेडा झाला काय? मुकाट्याने पंधरा हजार रुपये घेऊन ये.’’ समोरच्याने दमात घेत म्हटले.
‘‘तुम्ही माझ्या मुलाचं अपहरण केलं ते केलं. शिवाय माझ्याशी उद्धटपणेही वागताय. थांबा मी तुमची पोलिसांतच तक्रार करतो.’’ बबनने रागाने म्हटलं.
‘‘ए, पोलिसांत काय तक्रार करतोस? आम्हीच पोलिस आहोत. तुमच्या मुलाकडे कसली कागदपत्रं नाहीत, हेल्मेटही नाही, मागचीही थकबाकी आहे. या सगळ्या दंडाची रक्कम पंधरा हजार रुपये आधी भरा. मग पुढचं बोला.’’ समोरच्याने दम दिल्यावर बबनही नरमला. त्याने ताबडतोप संबंधित चौक गाठला.
‘‘साहेब, तुम्ही आहात होय. मला वाटलं, माझ्या मुलाचं अपहरणच झालंय. तरी म्हटलं ते एवढी कमी रक्कम का मागतायत.’’ बबनने म्हटलं.
‘‘आता वाहतुकीच्या दंडाची रक्कम वाढली आहे. त्यामुळे पंधरा हजार रुपये भरा.’’ एका पोलिसाने म्हटले.
‘‘साहेब, पाचशे रूपयांत जमवा की.’’ बबनने म्हटले.
‘‘तुम्ही काय मंडईमध्ये भाजीपाला खरेदीला आलाय काय? तुमचा मुलगा तर शंभरमध्ये मिटवा म्हणत होता. हे असलं काय चालणार नाही. मुकाट्याने पंधरा हजार भरा. आम्हालाही काही टार्गेट वगैरे असतात.’’ पोलिसानं रागानं म्हटलं.
‘‘साहेब, आमच्या घरातील कोणाचंही अपहरण होईल म्हणून मी पैसे साठवून ठेवले होते. त्यातील पैसे द्यावे लागतील.’’ बबनने काकुळतीला येत म्हटलं.
‘‘मग अपहरणच झालं आहे, असं समजा आणि पंधरा हजार काढा. शिवाय वर पावतीही देतो. अपहरण झालं असतं तर कोणी पावती दिली असती का?’’ पोलिसांचा हा मुद्दा बबनला बिनतोड पटला. त्याने निमूटपणे पंधरा हजार रुपये भरले व घरी जाताना स्वतःसह तिघांसाठी हेल्मेटची खरेदी केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top