परीक्षा ऑफलाइनच घ्या

परीक्षा ऑफलाइनच घ्या

आमची परीक्षा ऑफलाइनच घ्या

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची अपेक्षा; अभ्यासावरच ठरवावे मूल्यांकन

पिंपरी, ता. ११ ः गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट वाढत आहे. त्यात ओमिक्रॉनची भर पडली आहे. त्यामुळे सरकारने निर्बंध घातले आहेत. अशा वातावरणात विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारी दहावी-बारावीची परीक्षा दीड महिन्यावर आली आहे. प्रत्यक्ष परीक्षा होणार की गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अंतर्गत मूल्यमापणावर निकाल दिला जाणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, ‘आमची परीक्षा ऑफलाइन अर्थात प्रत्यक्षच व्हायला हवी,’ अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. ‘आम्ही अभ्यासात नेमके कुठे आहोत?’ हे अभ्यासातूनच कळेल, हा आत्मविश्वास त्यांच्याशी संवाद साधताना जाणवला.
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा उद्रेक झाला. त्यावेळी दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू होत्या. लॉकडाउन निर्बंध लावले गेले. परीक्षा अर्धवट स्थितीत रद्द करावी लागली. त्यामुळे काही विषयांची परीक्षा देता आली नव्हती. २०२१ मध्ये परीक्षाच रद्द करावी लागली. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे अर्थात अंतर्गत लेखी परीक्षा; गृहपाठ, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा आणि नववीचा अंतिम निकालातील गुण या आधारे दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. बारावीच्या परीक्षेबाबतही असाच निर्णय घेण्यात आला होता. आताही संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. शाळा बंद आहेत. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षांवर कोरोनाचे सावट आहे. असे असले तरीही, परीक्षा झालीच पाहिजे, अशी विद्यार्थ्यांची भूमिका असल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवले.

दहावीचे विद्यार्थी म्हणाले...
- जितेंद्र कुलकर्णी (आकुर्डी) ः ऑनलाइन परीक्षा घेतल्यास कॉपी होऊ शकते. तसेच, अंतर्गत गुणांच्या आधारेही निकाल लावायला नको. यामुळे अधिक गुण मिळून मुलांना ओव्हर कॉन्फिडन्स येऊ शकतो.
- श्रेया ढोले (चऱ्होली) ः आम्ही पूर्ण अभ्यास केला आहे. करियरच्या दृष्टिने ऑफलाइनच परीक्षा व्हायला हवी. कोरोना काळात पास झालेले विद्यार्थी, असा शिक्का आमच्यावर बसायला नको.

बारावीचे विद्यार्थी म्हणाले...
- श्रेया आपटे (निगडी) ः बारावीचे वर्षे हे आमच्यासाठी बेस आहे. भावी शिक्षणाचा पाया आहे. त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षा झाली पाहिजे. त्यामुळे अभ्यासात आपण कुठे आहोत, हे आम्हाला कळेल.
- अद्वैत फडके (चिंचवड) ः अंतर्गत गुणांमुळे आपण अभ्यासात नेमके कुठे आहोत, हे कळत नाही. प्रत्यक्ष परीक्षा देताना मात्र वेळेकडे लक्ष देऊन उत्तरे लिहावी लागतात. त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षा झाली पाहिजे.

अंतर्गत गुण महत्त्वाचे
गेल्या वर्षी कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करावी लागली होती. त्यावेळी अंतर्गत गुण महत्त्वाचे ठरले होते. शहरातील १९ हजार ३७३ विद्यार्थी दहावीला होते. त्यातील १९ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले होते. त्यातील १९ हजार ३५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. अंतर्गत लेखी परीक्षा न दिलेले व वर्षभर शाळेत न गेलेले १४ विद्यार्थी नापास झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com