स्वच्छतेसाठी अनेक उपाय; पण, नागरिकांना शिस्त हवी

स्वच्छतेसाठी अनेक उपाय; पण, नागरिकांना शिस्त हवी

रस्त्यावर कचरा अन् वापरलेले मास्कही

पालिकेकडून स्वच्छतेसाठी उपाययोजना; नागरिकांकडून उघड्यावर लघुशंका, प्रातर्विधी

पिंपरी, ता. १४ ः शहर स्वच्छतेसाठी महापालिका विविध उपाययोजना करीत आहे. मात्र, काही ठिकाणी सुविधा पुरेशा नसल्याने अस्वच्छता निर्माण होत असल्याचे चित्र आहे. स्वच्छतेबाबत काही नागरिकांची मानसिकताच नसल्याचे दिसते. कारण, शहरात अनेक ठिकाणी उघड्यावर लघुशंका व प्रातर्विधी केला जात आहे. रस्त्याच्या कडेला, हॅंगिंग बिनऐवजी त्याच्या खाली कचरा टाकला जात आहे. वापरलेले मास्क रस्त्यावर पडलेले दिसत आहेत. यामुळे शहर स्वच्छ राहणार कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महापालिकेतर्फे शहर स्वच्छतेसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. स्वच्छतेसाठी प्रायोगिक तत्त्वावर चार प्रभागात ‘इंदूर पॅटर्न’ राबविला जात आहे. कचराकुंडी मुक्त प्रभाग करून घरोघरचा कचरा घंटागाडीद्वारे संकलित केला जात आहे. ओला व सुका बरोबरच प्लॅस्टिक, काच, फर्निचर असे घरातच वर्गीकरण करून कचरा घेतला जात आहे. यापूर्वी घरोघरी ओला-सुका कचरा वर्गीकरणासाठी मोफत डस्टबिन दिले होते. आता अनुदान देऊन चार हजार कुटुंबांना कंपोस्ट बीन दिले जाणार आहेत. त्यामाध्यमातून ओला कचरा कंपोस्ट केला जाणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांनाही आपल्या कचऱ्यावर आपणच प्रक्रिया करण्याची सूचना आयुक्तांनी केलेली आहे. असे न करणाऱ्या सोसायट्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

महापालिकेचे प्रयत्न
- इंदूर महापालिकेप्रमाणे सहा प्रकारे कचरा विलगीकरण करूनच घराघरांमधून घंटागाड्यांमार्फत संकलित केला जात आहे
- गृहनिर्माण सोसायट्यांप्रमाणे ओल्या कचऱ्याचे घरामध्येच कंपोस्टिंग करायचे आहे, कंपोस्ट बीन घेण्यासाठी अनुदान देणार
- शहराच्या सर्व भागांतील कचरा कुंड्या हटवल्या असून घंटाघाड्यामधून कचरा संकलन करण्यासाठी संकलन केंद्र उभारणार
- रस्ते व पदपथांवरील बेवारस, नादुरुस्त व भंगार वाहने हटविण्यासाठी मालकांना नोटीस दिली आहे, त्यानंतर स्वतः हटविणार
- रस्त्यावर थुंकणे, अस्वच्छता करणे, मास्क नसणे, बंदी घातलेल्या प्लॅस्टिक पिशव्या वापरल्यास दंडात्मक कारवाई सुरू आहे
- प्लॅस्टिकमुक्त शहरासाठी पाण्याच्या वापरलेल्या पाच प्लॅस्टिक बाटल्यांच्या बदल्यात चहा व दहाच्या बदल्यात वडापाव देणे
- रस्ते सफाईसाठी मनुष्यबळाद्वारे नियमित स्वच्छतेवर भर, पदपथांवरील गवत, झाडेझुडपे, पालापाचोळा गोळा केला जात आहे
- शहराच्या वेगवेगळ्या भागात फ्लॉगेथॉनचे आयोजन करून स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे, लोकसहभाग वाढीवर भर

उदाहरणादाखल अस्वच्छतेची ठिकाणे
- महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर पुणे-मुंबई महापामार्गावर पिंपरी चौकालगत बॅक इंडियाच्या सीमाभिंतीलगतच्या डीपी बॉक्स परिसरात पदपथावरच लघुशंका केली जाते.
- पुणे-मुंबई लोहमार्गाच्या कडेला दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, बिजलीनगर परिसरात अनेक ठिकाणी प्रातर्विधी केला जातो. कचरा टाकला जात आहे.
- पिंपरी-चिंचवड लिंक रस्त्यावर स्मशानभूमीलगत, पवना नदीवरील घाटांच्या परिसरात अस्वच्छता दिसून येते. आरोग्य कर्मचाऱ्यांनी सफाई केल्यानंतरही अस्वच्छता केली जाते.
- शहरातील उड्डाणपुलांखाली, मोकळ्या जागा, काही बसथांब्यांवर उतारकरू, भटक्या व्यक्तींचे वास्तव्य असलेल्या भागात अस्वच्छता असते. उदा. निगडी उड्डाणपुलाखाली, ‘एचए’चा नेहरूनगर येथील भूखंड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com