
ड्रेनेजच्या पाण्यात पडून युवकाचा मृत्यू
ड्रेनेजच्या पाण्यामध्ये पडून
म्हाळुंगेमध्ये युवकाचा मृत्यू
पिंपरी, ता. ३१ : ड्रेनेजच्या पाण्यात पाय घसरून पडल्याने सतरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हाळुंगे येथे घडली. याठिकाणी सुरक्षिततेची साधने न पुरवता, उपाययोजना न राबविता निष्काळजीपणा केल्याने ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला आहे.
पवन प्रवीण जमदाडे (वय १७, रा. म्हाळुंगे ) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी त्याची आई राधिका प्रवीण जमदाडे (रा. म्हाळुंगे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ड्रेनेज पाणी फिल्टर पंप येथील ठेकेदार बाळू जाधवर (रा. पुराणिक सोसायटी, म्हाळुंगे ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पवन हा शुक्रवारी (ता. २८) म्हाळुंगे येथील पुराणिक सोसायटी येथे ड्रेनेजच्या पाणी फिल्टर पंप येथे कामासाठी गेला होता. मात्र, रात्री तो परतला नाही. त्याचा मोबाईल बंद असल्याने व कामावरही तो नसल्याने कुटुंबियांनी नातेवाईकांसह मित्रांकडे त्याचा शोध घेतला. मात्र, तो कुठेही मिळून आला नाही. त्यामुळे हिंजवडी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली.
दरम्यान, पवन याचा मृतदेह तो काम करीत असलेल्या ड्रेनेजच्या पाण्यात आढळून आला. कामाच्या ठिकाणी कोणतेही सुरक्षेची साधने अथवा भिंत नसल्याने त्याचा पाय घसरून पाण्यात पडल्याने पवनचा मृत्यू झाला.
------------------------
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..