‘आयटी’ची वाट बिकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आयटी’ची वाट बिकट
‘आयटी’ची वाट बिकट

‘आयटी’ची वाट बिकट

sakal_logo
By

वाकड, ता. १ : गेल्या अडीच वर्षांपासून आयटी उद्योग क्षेत्रात सुरू असलेली ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धत थांबणार आहे. मार्च किंवा एप्रिलमध्ये हिंजवडीतील आयटी कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, याठिकाणी मेट्रो रेल्वे मार्गाच्या कामासाठी अतिक्रमित केलेला रस्ता, पर्यायी व इतर काही रस्त्यांची रखडलेली कामे यामुळे वाहतूक समस्येचे पुन्हा ग्रहण लागणार आहे. साहजिकच मेट्रो जोमात आणि आयटी कर्मचारी जाणार कोमात, असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

आयटीनगरी हिंजवडीची वाहतूक समस्याही नेहमी जटिल आहे. लॉकडाउनपूर्वी सकाळ आणि सायंकाळी आयटीच्या कार्यालयीन वेळेत हिंजवडीत येणाऱ्यांची संख्या सुमारे आठ ते १५ लाखांवर होती. अपुरे पडणारे मुख्य रस्ते, पर्यायी रस्त्यांची वानवा यामुळे आयटीयन्सची दमछाक होत असे. रस्त्यांचे सक्षम जाळे उभारण्यात अद्यापही एमआयडीसी, पीएमआरडीए, पीडब्ल्यूडी, महापालिका प्रशासनाला यश मिळालेले नाही. कंपन्या सुरू होण्यापूर्वी मुख्य रस्ते, पर्यायी रस्त्यांची कामे पूर्ण होऊन वाहतूक समस्या कायमची सुटेल, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा फोल ठरली आहे.

हिंजवडी इंडियन ऑइल पंपापासून फेज तीनपर्यंत मेट्रो मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासाठी मुख्य रस्त्यावर सात किमी अंतरापर्यंत सुमारे २५ फूट बॅरिकेड लावल्याने रस्ता अरुंद झाला आहे. पूर्वी रस्ता प्रशस्त असतानाही हिंजवडीतून बाहेर पडायला एक तासापेक्षा अधिक वेळ लागायचा. आता रस्ते लहान झाल्याने वाहतूक कोंडीत कमालीची भर पडणार आहे. त्यामुळे आयटीयन्सची वाट आहे, त्यापेक्षाही बिकट होण्याची शक्यता आहे.

रखडलेले, अर्धवट राहिलेले रस्ते
माण-म्हाळुंगे रस्ता, म्हाळुंगे ते चांदे-नांदे मार्गे फेज तीनकडे जाणारा रस्ता, विनोदेनगर ते ताथवडे शिव रस्ता, मर्सिडीज बेंझ शोरूम ते माण रस्ता, सुस-चांदे-नांदे रस्ता, पिरंगुट ते घोटावडे-हिंजवडी रस्ता, एमआयडीसी व पिंपरी-चिंचवड महापालिका साकारत असलेला हिंजवडी-वाकड रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम या रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ रखडले. यासह वाकड अंडरपास ते हिंजवडी फेज एक व सुरतवाला कॉम्प्लेक्स ते फेज एक हे दोन रस्ते अद्याप नकाशावरच आहेत. ताथवडे-पुनावळे अंडरपासची उंची वाढण्याला मुहूर्त मिळाला नाही.

अर्थकारणाला उतरती कळा
दोन वर्ष उलटून गेले, तरी कंपन्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असल्याने एरवी ओसंडून वाहणारी आयटीनगरी ओस पडली आहे. लाखोंच्या संख्येने येणारा जनसमुदाय अचानक नाहीसा झाल्याने आयटीवर अवलंबून असणारे असंख्य व्यवसाय-धंदे ठप्प आहेत. एकमेकांवर अवलंबून असणारी आर्थिक साखळी कोलमडली असून अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आयटी पार्क सुरू होण्याची सर्वांनाच आतुरता असताना प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आयटीत वाहतूक समस्या अडचण ठरू शकते.

‘‘दोन वर्षांत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण होतील, त्यानंतर मेट्रो मार्गाचे काम सुरू झाल्यास वाहतुकीला अडथळा होणार नाही, असे वाटत होते. मात्र, कामांना उशीर झाला आहे, त्यामुळे आयटी पार्क सुरू झाल्यास वाहतूक समस्या निर्माण होऊ शकते. आम्ही सर्व प्रशासनाशी पाठपुरावा करून अर्धवट कामे पूर्ण करून घेत आहोत.’’
- कर्नल चरणजित भोगल, मुख्य कार्यकारी अधिकारी, एचआयए

‘‘गेल्या दोन वर्षांच्या काळात आयटी पार्क बंद असताना युद्ध पातळीवर पर्यायी रस्त्यांची कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. त्यात आता मेट्रोचे काम सुरू झाल्याने ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ अशी अवस्था झाली आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त पद्मनाभन यांनी चक्राकार एकेरी वाहतूक राबवूनही समस्या काही प्रमाणात होतीच. त्यात अशा अवस्थेत आता आयटी पार्क पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास खूप बिकट वाहतूक समस्या उद्भवू शकते.’’
- मोनिका जोशी, आयटीयन

‘‘दोन वर्षे आयटी पार्क बंद असल्याने प्रशासनाला काम करण्यास चांगला वाव होता. रस्त्यांचे काम आज पूर्ण झाले असते, तर मेट्रो कामाचा अडथळा जाणवला नसता. मात्र, प्रशासनाकडे इच्छा शक्तीचा अभाव असल्याने ही सर्व कामे रखडली. आता आयटी पार्क पुन्हा सुरू झाल्यास ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशी स्थिती आहे.’’


- तुषार हाडके, आयटीयन