
रस्ता रुंदीकरणाचा आदिवासींच्या उपजिवेकेवर परिणाम
ऊर्से ,ता. १४ : शेळी व गुरे चरण्यासाठी डोंगराभागाकडे जाणारा मार्ग बंद झाल्याने ऊर्से गावातील वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या आदिवासी ठाकर समाजातील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत रस्ते विकास महामंडळास आदिवासी समाजाकडून निवेदन देण्यात आले आहे. ऊर्से येथील वाड्या वस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर आदिवासी ठाकर समाज राहतो. शेळीपालन, गाई, गुरे मोलमजुरी या व्यवसायावर त्याची दैनंदिन उपजीविका अवलंबून आहे. परंतु ऊर्से येथील द्रुतगतीमार्गावर मागील काही महिन्यांपासून रस्ते विकास महामंडळाकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील रुंदीकरण सुरू आहे. येथील खोदकाम केल्याने या ठिकाणी मातीचा खच, दगडांचा खच पडला आहे. त्यामुळे सर्विस रस्ता व पुलाखालील रस्ताही बंद झाला आहे. रस्ता बंद झाल्याने जनावरे द्रुतगती महामार्ग ओलांडून नेता येत नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जनावरे चरण्यासाठी लवकरात लवकर मार्ग मोकळा करून द्यावा अशी मागणी आदिवासी समाजातील शांताबाई पवार, सुरेखा पवार, मंगल पवार, इंदूबाई पावर, सविता मेंगळे, अंजाबाई ठाकर, विठ्ठल पवार, अविनाश डोळस, योगेश शिंदे आदींनी केली आहे. यावेळी नायब तहसीलदार भाऊसाहेब चाटे यांनी पाठपुरावा केला जाईल असे सांगितल्याचे भाजपचे किसान मोर्चाचे अध्यक्ष सुभाष धामणकर यांनी सांगितले. तसेच उपसभापती शांताराम कदम, अनंता कुडे, भारतीय किसान संघाचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ शेलार व माजी सरपंच कांचन धामणकर यांनी पाठिंबा देत तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे.
द्रुतगती महामार्गावरील कामामुळे डोंगरावर जनावरे चरावयास नेता येत नसल्याने जनावरे विकण्याशिवाय आमच्याकडे दूसरा पर्याय उरलेला नाही. लवकरात लवकर रस्ता तयार करून द्यावा.
-शांताबाई पवार ,आदिवासी ठाकर महिला