
भोसरीतील टपऱ्या, भाजी मंडईत बेकायदा वीज जोडण्या
भोसरी, ता. ४ ः येथील अनधिकृत टपऱ्या, भाजी मंडईतील गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा वीज जोडण्या घेतल्या आहेत. यामुळे महावितरण कंपनीचे नुकसान होत आहेच, शिवाय अपघाताचाही धोका संभवतो आहे. राजकीय दबाव, कर्मचाऱ्यांचे लागेबांधे यामुळे कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
भोसरी गावठाणात संत ज्ञानेश्वर भाजी मंडई उभारली आहे. मात्र, अद्याप ती सुरू केलेली नाही. त्यामुळे महापालिकेने तात्पुरते गाळे उभारून तिथे मंडई सुरू केली आहे. मात्र, काही गाळेधारकांनी जवळच्या डीपी बॅाक्समधून अनधिकृतरीत्या वीज जोड घेतल्याचे दिसत आहे. तसेच पीसीएमसी चौक ते वात्सल्य रुग्णालयापर्यंतच्या रस्त्यावरील बेकायदा टपऱ्या, चायनीज सेंटरमध्ये वीज चोरून वापरली जात आहे. बालाजीनगर व खंडे वस्तीमधील झोपडपट्टीत काही जणांकडून विद्युत खांबावर आकडे टाकून वीज घेतल्याचे आढळून येते. चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती नजीक उभारण्यात आलेल्या मंडईतील काही गाळे, भोसरी-आळंदी रस्ता चौकातील दिघीतील पुणे-आळंदी रस्त्यावरील काही टपऱ्या, भोसरी एमआयडीसीतील ईएल परिसर आदी भागातही असेच प्रकार आहेत.
वीज चोरी करण्यासाठी डीपी बॅाक्समधून धोकादायकपणे तारा अडकविल्या जातात. या तारांमुळे बॅाक्सची झाकणेही उघडी राहतात. त्यामुळे लहान मुले आणि भटक्या जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. झोपडपट्टीमध्ये खांबावर आकडे टाकून वीज घेतल्याने शॅार्ट सर्किट होण्याबरोबरच वीजेचा धक्का लागण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
सर्वसामान्य नागरिकाचे दोन महिने बिल थकल्यास कारवाईसाठी महावितरणचे कर्मचारी घरी जातात. थकबाकी कोणत्या कारणामुळे राहिली याची कोणतीही शहानिशा न करता थेट वीजप्रवाह तोडला जातो. भोसरीमध्ये दररोज हजारो युनिट चोरी होत असूनही महावितरणचे इकडे कसे काय लक्ष जात नाही? वीज चोरी करणारे लोक आणि कर्मचारी यांचे साटेलोटे तर नाही ना? राजकीय व्यक्तींचा अधिकाऱ्यांवर दबाव आहे का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. भोसरी परिसरातील विविध ठिकाणच्या रस्त्याकडील बेकायदा टपऱ्या आणि पत्राशेडची तपासणी करण्याची मागणी होत आहे.
कोट
वीज चोरीला आळा बसण्यासाठी भरारी पथके तयार केली आहेत. प्रकार उघडकीस आल्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतात. गुन्हे दाखल झाल्यावर दंडासह तुरुंगवासही होऊ शकतो. टपरी व पत्राशेड धारकांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधल्यास नियमाप्रमाणे वीज मिळू शकते. वीज चोरीमध्ये कोणतीही सुरक्षितता नसल्याने दुसऱ्याचाही जीव धोक्यात येवू शकतो.
- निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी
फोटो ः - भोसरी गावठाण, भोसरी ः येथील नव्याने उभारण्यात आलेल्या भाजी मंडईजवळील विद्युत डीपी बॅाक्समधून होत असलेली वीज चोरी. (माहितीसाठी- डीपीपुढे विद्युत पोल आहे.)
संत ज्ञानेश्वर भाजी मंडई, भोसरी ः येथील विद्युत डीपी बॅाक्समधून गेलेले विद्युत केबलचे जाळे यातील किती अधिकृत आहेत हा प्रश्न आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00621 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..