
नाट्कांऐवजी इतरच कार्यक्रमांसाठी वापर
भोसरी, ता. ५ ः पिंपरी-चिंचवड शहराचा वाढता विस्तार लक्षात घेवून भोसरी येथे ‘अंकुशराव लांडगे नाट्यगृह’ उभारले. मात्र, नाटकांपेक्षा इतर कार्यक्रमच अधिक होतात. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील इतर सर्व नाट्यगृहाच्या तुलनेत उत्पन्न अधिक मिळत असले तरी दर्जेदार व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होण्याची गरज रसिकांना आहे.
या नाट्यगृहाचे उद्घाटन १७ जानेवारी २०११ रोजी झाले. आसन क्षमता साडेनऊशे आहे. पहिल्या वर्षी ५८ नाटके झाली. तर २०१२ मध्ये ५६, २०१३ मध्ये ८८ नाटके झाली. त्यानंतर मात्र उतरती कळा लागली. २०१८-१९ मध्ये केवळ नऊ नाटके झाली. त्यानंतर आतापर्यंत ही संख्या शून्यावरच आली आहे. नाट्यगृहाच्या सुविधेमुळे दर्जेदार नाटके पाहायला मिळतील अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, परिसरातील बहुतांश वर्ग कामगार असल्याने व्यावसायिक नाटकांचे तिकीट दर त्याला परवडत नाहीत. साहजिकच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे नाट्य कंपन्याही येथे येथे प्रयोग लावण्यास उत्सुक नसतात. शाळांची स्नेहसंमेलने, सामाजिक व व्यावसायिक संस्था, कंपन्यांचे सेमिनार आदींसह राजकीय कार्यक्रम अधिक प्रमाणात होतात. त्यामुळे उत्पन्न सुरू आहे. पण नाटकातून नाही, अशी स्थिती आहे.
--
या सुविधा हव्यात
१. कॅन्टीन ः नाट्यगृह सुरू झाल्यापासून कॅन्टीन भाडे तत्त्वावर देण्याचा प्रस्ताव रेंगाळलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी कार्यक्रमासाठी येणारे विद्यार्थी आणि श्रोते यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथे कार्यक्रम घेणाऱ्या शाळा व संस्थांना कॅन्टीन सोय स्वतःहून करावी लागते.
२. मेटल डिटेक्टर ः नाट्यगृहात सीसीटीव्ही आहेत. मात्र अद्याप मेटल डिटेक्टर बसवलेला नाही. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा कार्यक्रम असल्यास पोलिसांद्वारे येथे मेटल डिटेक्टर आणून लावला जातो आणि कार्यक्रम झाल्यानंतर काढला जातो.
३. वातानुकूलित यंत्रणा ः यंत्रणेत एक महिन्यापासून बिघाड झाला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नाट्यगृहात बसणे नकोसे होते.
--
लावणीची मागणी, मात्र परवानगी नाही
येथे केवळ लावणीचे स्वतंत्र कार्यक्रम होत नाहीत. अशा कार्यक्रमावेळी मद्यपान करून येणाऱ्यांची संख्या अधिक असते. अनेकदा वादावादीचे प्रसंग घडतात. पान-तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती, कोपरे घाण होतात. अशामुळे लावणी कार्यक्रमांना परवानगी दिली जात नाही, नाट्यगृह व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
नाट्यगृहाचे उत्पन्न
वर्ष कार्यक्रम उत्पन्न
२०११ ते २०१३ ६३८ ८५७६२४४
२०१३ ते २०१५ ६७० १,११,१२, ४१७
२०१५ ते २०१७ ७६६ १,३७,७९,२२१
२०१७ ते २०१९ ८७५ १,८६,२१,८४६
२०१९ ते २०२१ ५८३ ७१,८७,५७८
( २०१९ ते २०२१ कालावधीत कोरोना लॅाक डाउनमुळे उत्पन्न कमी.)
Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00625 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..