
महिलांनी मांडले गाऱ्हाणे
भोसरी, ता. ६ ः पिण्याचे पुरेसे पाणी मिळत नाही, घंटागाडी दोन-तीन दिवसांतून एकदा येते, परिसराची स्वच्छता होत नाही, पाणी सुटण्याची वेळ गैरसोयीची आदी समस्या भोसरीतील चक्रपाणी वसाहतीतील आनंदनगरमधील महिलांनी माजी नगरसेवक पंडित गवळी, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता किरण अंदुरे, कनिष्ठ अभियंता विजय लाडे यांच्यासमोर मांडले.
भोसरीतील चक्रपाणी वसाहतीतील आनंदनगरमध्ये पाणी दुपारी तीन वाजता सोडले जाते. ही वेळ कामगार महिलांसाठी गैरसोयीची आहे. पाणी पुरेसे दाबाने येत नसल्याने पुरेसे पाणी भरता येत नाही. पाणी येण्याच्या वेळेसच बऱ्याचवेळा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने पाणी भरता येत नाही. कचरा नेणारी घंटा गाडी दोन-तीन दिवसांनी येत असल्याने घरातील कचऱ्यापासून दुर्गंधी येते. त्यातही घंटागाडी सकाळी न येता दुपारी दोनच्या सुमारास येत असल्याने कामगारांना कचरा टाकता येत नाही. येथील नागरिकांना कचरा विलगीकरणासाठीच्या डस्टबिन देण्यात आलेल्या नाहीत, आदी समस्या लीना डोळस, सुनीता शेंगाळे, अलका थोरात, मीना फाळ, सिंधू गावडे, सीमा बांगर, सीमा गावडे, मानू खारेकर, अरुणा पवार, कलावती जरे, रंजना डोंगरे, ताराबाई यादव, अलका पाटील, अलका यादव, संगीता नरवणकर, लक्ष्मी गिरी, वैशाली सातपुते आदी महिला मांडत होत्या. या विषयी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क होऊ शकला नाही.
‘‘आनंदनगर परिसरातील जलवाहिनी बंद झाल्याची शक्यता आहे. ते शोधण्याचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. यासाठी परिसरातील पाइपलाइन खोदून ती दुरुस्तही केली जात आहे. लवकरच येथील पाण्याची समस्या सुटेल.’’
- किरण अंदुरे, उपअभियंता
‘‘बऱ्याच नागरिकांनी भाडेकरू ठेवले आहेत. मात्र, त्यांनी भाडेकरुंच्या प्रमाणात अधिक नळ जोड घेतले नसल्याने काही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. काही नागरिकांनी अनधिकृत नळजोडही घेतले आहेत.’’
- विजय लाडे, कनिष्ठ अभियंता
प्रभाग रचनेची अडचण
गेल्या निवडणुकीत चक्रपाणी वसाहतीचा आनंदनगरसह काही भाग चऱ्होली प्रभागाला जोडण्यात आला होता. या प्रभागातून निवडून येणारे प्रतिनिधी हे चऱ्होली आणि मोशी भागातील असल्याने या भागातील समस्या सोडविण्यास लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी पाच सहा किलोमीटरचे अंतर कापून जावे लागत होते. हे येथील नागरिकांना अत्यंत गैरसोयीचे झाल्याचे मत काही महिलांनी बोलून दाखविले. त्यामुळे प्रभाग रचना ठरविताना महापालिकेने सामान्य नागरिकांचे मत जाणून घेण्याची गरज असल्याचे मत काही महिलांनी मांडले.
फोटो- चक्रपाणी वसाहत, भोसरी ः येथील आनंदनगरमधील महिला पाण्याची समस्या रिकामे पाण्याचे हंडे दाखवून पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता किरण अंदुरे यांच्यासमोर मांडताना.
Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00626 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..