
भोसरीतील टाकीच्या वादावर न्यायालयाचा पडदा
भोसरी, ता. १५ ः येथील इंद्रायणीनगरातील पाण्याची टाकी कोणत्या जागेवर उभारावी यावर निर्णय घेणे हे न्यायालयाचे काम नाही, तर महापालिकेने योग्य जागेची निवड करून योग्य ठिकाणी पाण्याची टाकी उभारण्याचे आदेश महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे भोसरीतील इंद्रायणीनगरातील पाण्याच्या टाकी उभारण्यासाठीचा वाद संपुष्टात आला आहे.
भोसरीतील इंद्रायणीनगरातील ओम कॅालनीमधील प्लॅाट क्रमांक चारमध्ये दत्त मंदिर आहे. महापालिकेने पाण्याची टाकी उभारण्यासाठीचे कामाचे नियोजन केले होते. मात्र, काही स्थानिक नागरिकांनी येथील पाण्याच्या टाकीच्या उभारणीस विरोध करत पाण्याची टाकी मोकळा प्लॅाट क्रमांक तीनमध्ये उभारण्याची मागणी केली होती. प्लॅाट क्रमांक चारमध्ये दत्त मंदिर असल्याने येथे पाण्याची टाकी उभारू नये यासाठी काही नागरिक मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने या विषयावर निर्णय देताना म्हटले आहे, की कोणत्या जागेवर पाण्याची टाकी उभारावी याचा निर्णय घेणे हे न्यायालयाचे काम नाही. तर पाण्याची टाकी बांधणीसाठीचा योग्य भूखंड अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून महापालिकेने ठरवायचा आहे. मात्र, पाण्याच्या टाकीसाठी योग्य भूखंड ताबडतोब निवडण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश महापालिकेला देत आहे. नागरिकांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी योग्य भूखंड निवडीनंतर दोन वर्षात पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्याचे निर्देशही महापालिकेला देण्यात येत आहेत.
न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर दोन्ही गटाद्वारे निर्णय आपल्याच बाजूने लागल्याचा दावा करण्यात येत आहे. सध्या महापालिकेवर प्रशासक कार्यभार पाहत आहेत. त्यामुळे प्रशासकाद्वारे ही पाण्याची टाकी उभारण्यासाठी कोणत्या जागेची निवड करण्यात येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, येत्या महापालिका निवडणुकीत येथील पाण्याच्या टाकीचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00631 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..