
भोसरीतील बालोद्यानात ४० हजार वृक्ष लागवड ग्रीन यात्रा संस्थेचा उपक्रम; पश्चिम घाटातील वनराईचा समृद्धपणा अनुभवण्याची नागरिकांना संधी
भोसरी, ता. १४ ः येथील आळंदी रस्त्यावरील कै. रामभाऊ गबाजी गवळी बालोद्यानात ग्रीन यात्रा संस्थेद्वारे चाळीस हजार रोपांची लागवड केली आहे. यामध्ये सह्याद्री पर्वत रांगामधील देशी-जंगली प्रकाराची झाडे आहे. तसेच पश्चिम घाटातील वनराईचा समृद्धपणा अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
पुण्यातील ग्रीन यात्रा संस्था पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवत आहे. महापालिकेने वृक्षारोपनासाठी कै. रामभाऊ गबाजी गवळी बालोद्यानाची जागा संस्थेला दिली आहे. तर संस्थेला या प्रकल्पासाठी व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) अंतर्गत सॅंडविक ग्रुप, व्हेक्टर इन्फोरमेटिक, यूबी सॅाफ्ट, डीसीबी बॅंक आदी निधी देत आहेत. शुक्रवारी (ता. १३) चाळीस हजार रोपांच्या लागवडीचा कार्यक्रम पूर्ण केला. या उद्यानात प्रथम जमिनीचे सपाटीकरण करून रोपांना पोषक असा मातीचा पोत तयार करत, दहा हजार चौरस मीटर क्षेत्रावर रोपांची लागवड केली आहे. रोपांना काठ्यांचा आधार दिला आहे. त्याचप्रमाणे रोपांना देण्यात येणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन थांबविण्यासाठी आणि मातीत गारवा टिकविण्यासाठी मातीवर सुकलेले गवत पसरविले आहे.
एक चौरस मीटरमध्ये चार झाडे
या उद्यानात प्रत्येक चौरसमीटरवर चार वेगळ्या प्रकारची रोपे लावली आहेत. यामध्ये एक रोपे पन्नास फूटापेक्षा अधिक उंचीवर वाढणारे, दुसरे पन्नास फुटापेक्षा कमी तर तीस फुटापेक्षा अधिक उंचीपर्यंत वाढणारे, तिसरे वीस ते तीस फुटापर्यंत वाढणारे, तर चौथे झुडुप या प्रकारातील वीस फुटापेक्षा कमी उंचीवर वाढणाऱ्या रोपांची लागवड केली आहे.
पश्चिम घाटातील विविधता
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतील (पश्चिम घाट) जंगली-देशी प्रकारातील सुमारे पंचेचाळीस वेगळ्यावेगळ्या झाडांची रोपे या ठिकाणी लावली आहेत. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, बहावा, चिंच, शिवण, फणस, जांभूळ, आंबा, जाई-जुई, करवंदे, करंज, उंबर, साग, बदाम, बोर, बेहडा, कडूलिंब, निरगुडी, खैर, रिठा, काटेसावर, कदंब, कवठ आदींसह इतर रोपांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात या ठिकाणी पश्चिम घाटातील विविध रोपांच्या समृद्धतेचा सहवास नागरिक घेता येणार आहे. या उद्यानात औषधी वनस्पतींसह नक्षत्र वनही तयार करणार असल्याने उद्यानाला जैव विविधतेच्या उद्यानाचा दर्जा मिळणार आहे. त्याचप्रमाणे विविध रोपांच्या प्रकारामुळे विविध प्रकारचे पक्षी आणि कीटकांचेही हे अधिवास होणार आहे.
कोट
भोसरीतील कै. रामभाऊ गबाजी गवळी बालोद्यानात पहिल्या टप्प्यात चाळीस हजार रोपांचे संवर्धन केले जाणार आहे. संस्थेद्वारे येत्या तीन वर्षांपर्यंत येथील रोपांचे संवर्धन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात या उद्यानात आणखी एक ते दीड लाख रोपांची लागवड करणार आहे.
- जीवन शेवाळे, वरिष्ट व्यवस्थापक, ग्रीन यात्रा, पुणे
फोटो- ६४०८४
Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00637 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..