
नुकसान टाळण्यासाठी अतिक्रमणे स्वतःहून निघाली
भोसरी, ता. १४ ः महापालिकेने भोसरी, मोशी परिसरातील पुणे-नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील अतिक्रमणांविरोधात जोरदार कारवाईस सुरूवात केली आहे. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने अतिक्रमणे वाचविण्यासाठी येणारा राजकीय दबाव निष्फळ ठरत आहे. साहजिकच कारवाईतील मोठे नुकसान टाळण्यासाठी लोक स्वतःहूनच अतिक्रमण काढून घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
महापालिकेने या अगोदर भोसरीतील लांडेवाडी चौक ते पीसीएमसी चौक या मार्गावरील अनधिकृत टपऱ्या, पत्राशेड, बांधकामांवर कारवाई केली. नंतर पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी ते मोशी रुंदीकरणास अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर गुरुवारपासून (ता. १२) क, ई, फ आणि बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाद्वारे हातोडा टाकण्यास सुरूवात केली. अतिक्रमणांची संख्या मोठी असल्याने कारवाई किमान आठवडाभर चालणार आहे. कारवाई थांबविण्यासाठी संबंधितांनी स्थानिक पुढाऱ्यांव्दारे प्रयत्न केले. मात्र, महापालिकेत प्रशासक असल्याने काही मात्रा चालत नसल्याचा अनुभव काहींना आला. त्यामुळे साऱ्यांनीच अतिक्रमण स्वतःहून काढण्यास सुरुवात केली आहे. क्रेनला मोठी मागणी असून त्यांचा व्यवसाय वाढला आहे. दरम्यान, अतिक्रमणे हटविल्याने महामार्ग रुंदीकरणासही सेवा रस्ते विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
--
अतिक्रमणां विरोधातील कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कारवाई आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अतिक्रमण करणे टाळले पाहिजे. त्याचप्रमाणे भोसरी आणि मोशी परिसरात अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमणांवरही कारवाई होणार आहे.
-संजय घुबे, कार्यकारी अभियंता, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग
--
अशी झाली कारवाई...
ठिकाण तारीख क्षेत्रीय कार्यालय कारवाई झालेली संख्या
धावडेवस्ती ते पांजरपोळ १२ क १२५
मोशी टोलनाका ते बनकरवस्ती १२ ई ४५
मोशीतील भारतमाता चौक ते गोडाऊन चौक १३ ई ५५
भोसरी प्रभाग क्रमांक ५ व ७ १३ ई ४२
जय गणेश साम्राज्य ते बोराटेवस्ती १३ क ८४
--
फोटो- मोशी ः येथील अनधिकृत बांधकामावर शनिवारी (ता. १४) कारवाई होत असताना.
Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00638 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..