
गर्दीच्या उत्साहात भोसरीमध्ये भिर्रऽऽऽ
भोसरी, ता. १८ ः ठिकाण भोसरी गाव जत्रेचे बैलगाडा घाट...हलगीचा घनघनाट...शंभर भोंगे...तरुणाईची तुडुंब गर्दी...बेफाम धावणारे बैल...उधळणारा भंडारा आणि उडणारा मातीचा फुफाटा... निवेदकाचा ''हुर्रर्र...'' चा गगनभेदी आवाज...आणि तरुणांचा उत्साह अशा वातावरणात नागरिकांनी बैलगाड्यांचा थरार अनुभवला.
भोसरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या झालेल्या उत्सवात काही कारणांमुळे बैलगाडा शर्यत होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे बुधवारी (ता. १८) भोसरी ग्रामस्थाद्वारे भोसरीतील गावजत्रा मैदानात बैलगाडा शर्यत घेण्यात आली. बैलगाडा शर्यतीत दीडशे बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला. बैलगाडा शर्यत जिंकण्यासाठी बैलगाडा मालक बैलांची बेफाम दौड घडवून आणत होते. तर बैलांना काबूत ठेवण्यात तरुणाई अग्रेसर होती. येथे शंभर भोंगे लावण्यात आल्याने बैलगाडा शर्यतीचे निवेदकाने केलेले वर्णन दूरपर्यंत पोचत होते. ही शर्यत सायंकाळी साडेसहापर्यंत घेण्यात आली. बैलगाडा शर्यंतीवर लाखो रुपयांच्या बक्षीसांसह देण्यात येत असलेल्या दुचाकी बक्षीसीमुळे कोरोनाकाळातील कसर एकाच शर्यतीत भरून काढल्याची चर्चा नागरिकांत होती. दोन वर्षानंतर बैलगाडा शर्यत होत असल्याने बैलगाडा घाटात बैलगाड्यांच्या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. सर्व ठिकाणी बैलगाडा, टेम्पो आणि खाद्य पदार्थांचे स्टॅाल लागल्याने भोसरीत पुन्हा जत्रा भरल्याचा आनंद नागरिक घेत होते. शर्यत सुरू झाल्यावर स्टॅाप वाचमध्ये किती वेळ घेतली जाते, हे सर्वजण श्वास रोखून पाहत होते. गुरूवारीही (ता. १९) पुन्हा याच घाटावर बैलगाडा शर्यत होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
छायाचित्र ः प्रमोद शेलार
Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00647 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..