भिकाऱ्याकडे सापडला खजिना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिकाऱ्याकडे सापडला खजिना
भिकाऱ्याकडे सापडला खजिना

भिकाऱ्याकडे सापडला खजिना

sakal_logo
By

भोसरी, ता. २१ ः गेल्या काही वर्षापासून ‘त्याचा’ एकट्याचा संसार भोसरीतील राजमाता उड्डाणपुलाखाली होता. लोकांकडे भीक मागून जगत होता. कळकटलेले कपडे, कृश झालेले शरीर अशी दीनवाणी अवस्था. ते पाहून एकाने महापालिकेच्या सावली निवारा केंद्राला फोन केला. कर्मचारी आले आणि त्याला घेऊन जातात. मात्र तो तेथे गेल्यावर माझे पैसे राहिल्याचे वारंवार तेथील कर्मचाऱ्यांना सांगत राहिला. त्याची ती तळमळ पाहून कर्मचाऱ्यांनी तो जिथे बसत होता, तिथे शोधाशोध केली...आणि त्यांना ‘खजिना’ सापडला.

भोसरी-आळंदी चौकातील छत्रपती संभाजी महाराज फलक लावलेल्या तो ठिकाणी बसायचा. अगदी रस्त्याच्या अगदी मधोमध ही जागा आहे. रोज अनेक वाहने येथून ये-जा करतात, मात्र त्याच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. हे पाहून एका नागरिकाने महापालिकेच्या सावली निवारा केंद्राचे चालक एम. ए. हुसेन यांच्याशी संपर्क साधला. निवारा केंद्राची टीम शनिवारी (ता. २१) भोसरीत पोचली आणि त्या इसमास घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ती व्यक्ती जाण्यास तयार नव्हती. तेव्हा त्याला विश्वासात घेऊन त्याचे वाढलेले केस, दाढी करून त्याला व्हॅनमध्ये बसविले. मात्र, प्रवासात वारंवार माझे पैसे राहिल्याचे तो सांगत होता.

निवारा केंद्रात दाखल केल्यावर कर्मचारी पुन्हा भोसरीत आले. त्यावेळी तिथे भरपूर गाठोडे बांधून ठेवली होती. कर्मचारी एक-एक गाठोडे शोधून पाहत होते. असे करत असताना त्यांना एका गाठोड्यातून नाण्यांचा खणखणाट ऐकू आला. तेव्हा सगळ्याच्या नजरा त्या गाठोड्याकडे वळल्या. गाठोडे सोडले गेले तर त्यात खजिना मिळून आला. त्यात एक, दोन, पाच, दहा रुपयांच्या नाण्याबरोबरच शंभर, पन्नास, वीस आणि दहा रुपयांच्या नोटाही त्यात होत्या. दीड तास मोजणी केल्‍यावर नऊ हजार एकशे ५९ रुपये निघाले.

निवारा केंद्राद्वारे ही रक्कम त्या व्यक्तीवरच खर्च केला जाणार असल्याची माहिती संस्थेने दिली. औषधोपचाराबरोबरच त्याचे समुपदेशनही केले जाणार आहे. दरम्यान त्याला विश्वासात घेतल्यावर त्याने आपले नाव कल्याण भोसले असून पत्नीचे निधन झाल्यापासून येथे येऊन भीक मागून खात असल्याचेही सांगितले. सध्या एवढीच माहिती तो सांगता येत आहे. त्याच्याविषयी लवकरच त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती मिळविली जाणार असल्याचे संस्थेने सांगितले.

फोटो- भोसरी ः येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली वास्तव्य असलेल्या व्यक्तिला सावली निवारा केंद्रात दाखल केले जात असताना.

Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00657 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..