
खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत भोसरीतील स्थिती, अपघाताचा धोका असल्याने खड्डे बुजवण्याची मागणी
भोसरी, ता. १५ ः येथील विविध रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी घसरूनही पडत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाल्याने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी वाहन चालकांमधून होत आहे.
भोसरीतील दिघी रस्त्यावर सॅंडविक कॉलनीकडे वळणाऱ्या रस्त्यावर कामानिमित्त खोदलेला खड्डा खडीने बुजविला होता. पावसामुळे ही खडी उघडी पडली असून, रस्त्यावर खड्डा पडला आहे. सॅंडविक कॅालनीमधील प्रियदर्शनी शाळेकडे जाणारा हा रस्ता असल्याने येथे विद्यार्थी, पालक व इतर वाहन चालकांची गर्दी असते. या ठिकाणी वाहने आदळण्याच्या व दुचाकी घसरण्याच्या प्रमााणात वाढ झाली आहे. भोसरी-दिघी रस्ता चौक, चांदणी चौक, पीएमटी चौक, भोसरी गावठाणातील बापूजीबुवा चौक ते पीएमटी चौकापर्यंतचा रस्ता, पुणे-नाशिक महामार्गावर एसटी महामंडळ प्रशिक्षण चौक, धावडेवस्तीजवळ आदी ठिकाणीही रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
भोसरीतील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक दोनमधील शंकर मंदिराजवळ, इंद्रायणीनगर भाजी मंडईजवळ, पेठ दोनमधील इमारत क्रमांक २६ जवळ आदी भागातील रस्त्यावर खड्डे पडले आहे. इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक सातमधील संकेत हॅाटेल ते यशंवतराव चव्हाण चौक या रस्त्याचे डांबरीकरण दोन वर्षापूर्वी झाले आहे. या रस्त्यावरील चेंबरजवळील सिमेंट निखळून पडल्याने खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यावरही जागोजागी खड्डे पडले आहेत. यशवंतराव चव्हाण चौक ते कृष्णा हेरिटेज सोसायटीपर्यंतच्या रस्त्यावर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पाइपलाइन टाकली आहे. मात्र, तरीही या रस्त्यावर जागोजागी पाणी साचत आहे.
खोदकामानंतर डांबरीकरणाचा विसर
भोसरी आणि इंद्रायणीनगरातील रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका आणि महावितरणने विविध कामासाठी रस्ते खोदले. मात्र, काम झाल्यानंतर खड्डे डांबरकरणाने न बुजवता राडारोडा टाकून बुजविले. त्यामुळे सध्या सुर असलेल्या पावसामुळे या खड्ड्यातील राडारोडा वाहून जाऊन रस्त्यावर खड्डे पडले आहेत. महापालिकेने पावसाळ्यात काही खड्डे मुरूम मातीने भरले. मात्र जोरदार पावसामुळे तेही वाहून गेल्याने खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत.
भोसरीतील संत ज्ञानेश्वर भाजी मंडईसमोरील रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या दुपदरी रस्त्यापैकी एक पदरी रस्ता वाहतुकीसाठी खुला आहे. मात्र या रस्त्यात जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहने चालविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
दिघी रस्ता, भोसरी ः या रस्त्यावर सॅंडविक कॅालनीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
फोटो ः 00697
Web Title: Todays Latest Marathi News Bhs22b00698 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..