भोसरी ः शिधा घेण्यासाठी लांबच लांब रांगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरी ः  शिधा घेण्यासाठी लांबच लांब रांगा
भोसरी ः शिधा घेण्यासाठी लांबच लांब रांगा

भोसरी ः शिधा घेण्यासाठी लांबच लांब रांगा

sakal_logo
By

भोसरी, ता. २८ ः स्वस्त धान्य दुकानांमधील इ-पॉस यंत्रांमधील नेटवर्कच्या समस्येमुळे यंत्रावर शिधापत्रिका धारकाच्या नोंदणीस पंचवीस ते तीस मिनिटांचा वेळ लागत आहे. त्यामुळे, दुकानांसमोर शिधा घेण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शिधापत्रिका धारकांस शिधा घेण्यासाठी तीन-चार खेपा दुकानात माराव्या लागत असल्याने शिधापत्रिका धारक आणि दुकानदार यांच्यामध्ये बाचाबाचीही होत आहे. ही समस्या सोडविण्याची मागणी शिधापत्रिका धारक आणि दुकानदारांमधून होत आहे.
स्वस्त धान्य दुकानांमधील इ-पॉस यंत्रामध्ये मंगळवार (ता.२५) पासून नेटवर्कची समस्या सुरू झाली आहे. त्यामुळे, एका शिधापत्रिका धारकाची नोंद इ-पॉस यंत्रात करण्यासाठी अर्ध्या तासापर्यंतचा वेळ लागत आहे. आॅक्टोबर महिन्यात वेळेत शिधा न घेतल्यास त्या महिन्याचा शिधा बुडण्याची भीतीही काही शिधापत्रिका धारकांनी बोलून दाखविली.
शिधापत्रिका धारक सविता सुतार म्हणाल्या,‘‘ शिधा घेण्यासाठी गेल्या तीन दिवसांतून स्वस्त धान्य दुकानात दोन-तीन वेळा चकरा मारत आहे. आजही (ता.२८) दुकानात शिधा घेण्यासाठी गेल्या दोन तासांपासून उभी आहे.’’
भुसान शेख म्हणाल्या, “घरी लहान मुलांना सोडून शिधा दुकानात चकरा माराव्या लागत आहे. उशीर झाल्यावर शिधा न घेताच घरी जावे लागत आहे.”

‘‘इ-पॉस यंत्रे व्यवस्थित सुरू राहत नसल्याने शिधापत्रिका धारकांना शिधा वेळेत पुरवता येत नाही. त्यामुळे, शिधा पत्रिका धारकांबरोबर बाचाबाचीही होत आहे. शासनाने दिवाळी भेट आॅफलाइन देण्याची परवानगी दिली होती. तसाच आॅक्टोबरचा शिधाही आफलाइन वाटण्याची परवानगी द्यावी.’’
- निवृत्ती फुगे, अध्यक्ष, भोसरी स्वस्त धान्य दुकानदार संघटना

‘‘इ-पॉस यंत्राच्या नेटवर्कमधील बिघाड हा संपूर्ण राज्यात सुरू आहे. येथील इ-पॉस यंत्राच्या नेटवर्कमधील बिघाडाविषयी वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. मात्र, ही समस्या अशीच सुरू राहिल्यास आॅक्टोबरचा शिधा वाटण्यासाठी नोव्हेंबरमध्येही मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.’’
- नागनाथ भोसले, मंडल अधिकारी, भोसरी विभाग


BHS22B00788