भोसरीतील सुलभ शौचालयाचे गौडबंगाल लांडगे नाट्यगृह ः फूड प्लाझाला लागूनच शौचालय बांधल्याप्रकरणी महापालिकेचे कानावर हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरीतील सुलभ शौचालयाचे गौडबंगाल
लांडगे नाट्यगृह ः फूड प्लाझाला लागूनच शौचालय बांधल्याप्रकरणी महापालिकेचे कानावर हात
भोसरीतील सुलभ शौचालयाचे गौडबंगाल लांडगे नाट्यगृह ः फूड प्लाझाला लागूनच शौचालय बांधल्याप्रकरणी महापालिकेचे कानावर हात

भोसरीतील सुलभ शौचालयाचे गौडबंगाल लांडगे नाट्यगृह ः फूड प्लाझाला लागूनच शौचालय बांधल्याप्रकरणी महापालिकेचे कानावर हात

sakal_logo
By

भोसरी, ता. ७ ः भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ उभारण्यात आलेल्या फूड फ्लाझाला लागूनच सुलभ शौचालय उभारण्याचा अजब प्रकार झाला आहे. त्यामुळे ‘शौचालयाच्या दुर्गंधीयुक्त परिसरात फूड प्लाझा कसा चालणार’ असा प्रश्न नागरिकांना पडला आहे तर महापालिकेच्या बीआरटीएस विभाग आणि स्थापत्य विभाग, क्षेत्रीय कार्यालय यांनी सुलभ शौचालय बांधल्याचा इन्कार केला आहे. त्यामुळे ते कोणी बांधले याचे गौडबंगाल वाढले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागाद्वारे अर्बन सिटी डेव्हलोपमेन्ट अंतर्गत कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ फूड फ्लाझा उभारण्यात आला आहे. खवय्यांना बसण्यासाठी तिथे आसन व्यवस्थाही उभारण्यात आली आहे. मात्र फूड प्लाझाला लागूनच मैला टाकी असलेले सुलभ शौचालय बांधण्यात आले आहे. त्यामुळे खवय्ये या सुलभ शौचालयासमोर बसून खाण्याचा आस्वाद घेतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भोसरीमध्ये पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत अर्बन सिटी अंतर्गत विकास कामे सुरू आहेत. मात्र ‘बीआरटीएस’ने हे सुलभ शौचालय बांधल्याचा इन्कार केला आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या स्थापत्य विभागानेही हे सुलभ शौचालय बांधल्याचा इन्कार केला आहे. मात्र भोसरी परिसरात बीआरटीएस आणि स्थापत्य विभाग यांच्याद्वारेच विकास कामे करण्यात येत असतात. त्यांनाच हे शौचालय कोणी बांधले आहे, हे माहीत नसल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

‘‘भोसरीत फूड प्लाझाचे काम दोन वर्षापासून सुरू आहे. मात्र हे सुलभ शौचालय कोणी बांधले, हे माहीत नाही. मात्र हे सुलभ शौचालय स्वच्छ ठेवण्यास प्रशासनाला सांगण्यात येईल.’’
-प्रमोद ओंबासे, सह शहर अभियंता, बीआरटीएस

‘‘सुलभ शौचालय हे बीआरटीएसच्या जागेत बांधण्यात आले आहे. महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडे या शौचालयाच्या बांधणीसाठी कोणाद्वारेही परवानगी आलेली नाही. त्याचप्रमाणे हे शौचालय बांधण्यासाठी स्थापत्य विभागाद्वारे मोबदलाही देण्यात आलेला नाही.’’
-संजय घुबे, कार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग, क व इ क्षेत्रीय कार्यालय

‘‘क्षेत्रीय कार्यालय सुलभ शौचालय बांधत नाही. मात्र कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील सुलभ शौचालय बांधण्यासाठीची परवानगीही कोणी मागितली नाही. त्यामुळे हे सुलभ शौचालय कोणी बांधले याची माहिती नाही.’’

-राजेश आगळे, इ क्षेत्रीय अधिकारी.

नाट्यगृहाला दुर्गंधीचा त्रास

कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारालाच लागून हे सुलभ शौचालय उभारण्यात आले आहे. या शौचालयाच्या दुर्गंधीचा त्रास नाट्यगृहातील श्रोत्यांना होत असल्याची माहिती नाट्यगृह व्यवस्थापनाने दिली.


फोटो ः 00803