
बूथ रचना भक्कम केल्याने गुजरातमध्ये घवघवीत यश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
भोसरी, ता. १० ः भाजपने गुजरातमध्ये बूथ रचना भक्कम केल्याने तेथे पक्षाला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांनी बूथ रचना भक्कम करण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोसरीत केले.
भोसरीतील दिघी रस्त्यावरील मतदान केंद्रामध्ये येणाऱ्या बूथ प्रमुखांबरोबर संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पिंपरी-चिंचवड सरचिटणीस व शक्ती बूथप्रमुख विजय फुगे, चिंचवड विधानसभा प्रभारी शंकर जगताप, एकनाथ पवार, अमोल थोरात, सदाशिव खाडे, राजू दुर्गे, नंदू दाभाडे, अर्जुन ठाकरे, माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे, भीमाबाई फुगे आदींसह बूथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, ‘‘भोसरीतील शक्ती बूथमधील प्रत्येकाने किमान तीस मतदार कार्यकर्त्यांना निवडावेत. जेणेकरून त्यांना भाजपचा टिळा लावता येईल. जे बूथ प्रमुख तीस कार्यकर्ते तयार करतील, त्यांच्या घरी पंधरा दिवसांनी चहा पिण्यासाठी येणार आहे आणि मी दिलेला शब्द शंभर टक्के पाळतो.’’
शक्ती बूथप्रमुख विजय फुगे म्हणाले, “पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शब्द पाळणारे आहेत. त्यामुळे पिंपरीत झालेल्या शाई फेकीनंतरही ते भोसरीतील बूथ प्रमुखांशी संवाद साधण्यासाठी आल्याने बूथ प्रमुखांचा उत्साह वाढला आहे.”
दरम्यान, पिंपरीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्याच्या झालेल्या प्रकारामुळे भोसरीतील दिघी रस्ता, भोसरी-दिघी रस्ता चौक, पीएमटी चौक, पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता आदी भागांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. त्यामुळे परिसराला पोलिस छावणीच स्वरूप प्राप्त झाले होते.
फोटो
दिघी रस्ता, भोसरी ः बूथ प्रमुखांशी संवाद साधताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील. या वेळी चिंचवड विधानसभेचे प्रमुख शंकर पाटील आणि आमदार महेश लांडगे.
फोटोः 00813