
शिक्षणामध्ये संशोधन वृत्तीची गरज पालकमंत्री चंद्रकांत पाटील ः मोशूत महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन
भोसरी, ता. १८ ः देश श्रीमंत होण्यासाठी शिक्षणामध्ये संशोधनाची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. संशोधनाचे अधिकाधिक पेटंट विद्यार्थ्यांनी मिळवले पाहिजेत. त्यामुळे त्या पेटंटची रॉयल्टी जगभरातून आपल्याला मिळू शकेल. आपल्या देशाचा संरक्षणावरील खर्च ३५ टक्के असतो. त्यातही आपण ९० टक्के सामुग्री परदेशातून घेत होतो. मात्र, आता याच्या उलट होऊन संशोधनामुळे संरक्षणाची सामुग्री आपण ९० टक्के देशातच तयार करू शकलो, हे संशोधनाचे महत्त्व आहे, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
मोशीतील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मुलींसाठीच्या फार्मा महाविद्यालयाच्या हॉस्टेल व नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे होते. या वेळी आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर राहूल जाधव, माजी नगरसेविका अश्विनी जाधव, सामाजिक कार्यकर्ते निखील बोऱ्हाडे, सोसायटीचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. सुरेश तोडकर, डॉ. निवेदिता एकबोटे आदी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले, “काही शिक्षण संस्था प्रवेशासाठी डोनेशनच्या नावाखाली पालकांकडून मोठी रक्कम वसूल करतात. अशा संस्था संस्थाचालकांनी शैक्षणिक कार्यासाठी नाही तर व्यावसायिकतेसाठी सुरू केल्या आहेत. मात्र प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही शैक्षणिक कार्यासाठी सुरू करण्यात आली आहे.”
सोसायटीच्या सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी प्रास्ताविक केले. वृषाली तांबे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. शशिकांत ढोले यांनी आभार मानले.
फोटोः 00869