दुरुस्तीचे काम सुरू; तलाव बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुरुस्तीचे काम सुरू; तलाव बंद
दुरुस्तीचे काम सुरू; तलाव बंद

दुरुस्तीचे काम सुरू; तलाव बंद

sakal_logo
By

भोसरी, ता. २२ ः महापालिकेच्या जीवरक्षक बाळासाहेब बबनराव लांडगे जलतरण तलाव केंद्रातील जलतरण तलावाची खोली कमी करण्यासाठी स्थापत्य विभागाद्वारे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाला सहा महिन्याचा कालावधी लागणार असल्याने ऐन उन्हाळ्यात हे जलतरण तलाव बंद राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे.
भोसरीतील जीवरक्षक बाळासाहेब बबनराव लांडगे जलतरण तलाव केंद्रातील जलतरण तलावाची खोली चार ते चौदा फुटापर्यंत आहे. या जलतरण तलावात यापूर्वी दोन वेळा झालेल्या दुर्घटनेत दोन तरुणांना जीव गमवावा लागल्याची घटना घडली होती. जलतरण तलावात अशा घटना घडू नये म्हणून सरकारने जलतरण तलावाची खोली कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार भोसरीतील जलतरण तलावाची खोली कमी करण्यात येणार आहे.
सध्या या तलावाची खोली कमी करण्याचे काम सुरू आहे. याचबरोबर या तलावातील विद्युत, स्वच्छतागृह, इतर नागरी सुविधेसह तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षापासून हे जलतरण तलाव या-ना त्या कारणाने बंदच होते. आता दुरुस्तीसाठी हे जलतरण तलाव सहा महिने बंद राहणार आहे.

ऐन उन्हाळ्यात राहणार बंद
उन्हाळ्यात शाळा-महाविद्यालये बंद असतात. त्यामुळे उन्हाळ्यात तरुण-तरुणींबरोबरच नागरिकांची जलतरण तलावात पोहण्याचा आनंद घेण्यास येणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. मात्र ऐन उन्हाळ्यातच हे जलतरण केंद्र बंद राहणार असल्याने त्यांचा हिरमोड होणार आहे.

पार्किंगचे नियोजन
भोसरीतील जलतरण केंद्र हे तळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून आहे. त्यामुळे वाहनांच्या पार्किंगसाठी येथे पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. यासाठी महापालिकेद्वारे जलतरण केंद्राच्या आतील भागात पन्नास दुचाकी वाहनांच्या पार्किंगचे नियोजन करण्यात येणार आहे.


‘‘जलतरण तलाव बंद असल्याने पोहण्याचा आनंद घेता येत नाही. महापालिकेने जलतरण तलावाच्या सुशोभीकरणाचे काम लवकर पूर्ण करून हे जलतरण तलाव नागरिकांसाठी लवकरात लवकर खुले करावे.’’
- शशिकांत देसाई, भोसरी

‘‘भोसरीतील जीवरक्षक कै. बाळासाहेब बबनराव लांडगे जलतरण तलाव केंद्रातील तलावाची खोली चार ते साडेपाच फुटापर्यंत करण्यात येणार आहे. जलतरण तलावातील प्युरिफिकेशन, ड्रेनिंग आदी पाइपलाइन बदलण्यात येणार आहे. सुशोभीकरण करण्याचे काम येत्या सहा महिन्यात पूर्ण होईल.’’
- मनोज सेठिया, सह शहर अभियंता, स्थापत्य, उद्यान व क्रीडा विभाग