
महावितरण विरोधात लघुउद्योजक संघटनांचे आंदोलन
भोसरी, ता. २४ ः ‘महावितरण’ने चालू वर्षासाठी ३७ टक्के व पुढील वर्षापासून ४१ टक्के वीज दर वाढ करण्यास परवानगी मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. यास विरोध करण्यासाठी भोसरी एमआयडीसीतील विविध लघुसंघटनांद्वारे शुक्रवारी (ता. २४) ‘महावितरण’च्या भोसरी एमआयडीसीतील बालाजीननगरजवळील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्या नेतृत्वाखाली मेटल फिनिशर्स असोसिएशन, पुणे रबर असोसिएशन फेडरेशन असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवड, पिंपरी चिंचवड महिला लघु उद्योजक संघटना आदींनी सहभाग घेतला. तर संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी केले.
या आंदोलनात पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने अध्यक्ष संदीप बेलसरे, संस्थापक तात्या सपकाळ, उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव जयंत कड, प्रसिद्धी प्रमुख विजय खळदकर, संचालक संजय सातव, नवनाथ वायाळ, हर्षल थोरवे, भारत नरवडे, अतुल इनामदार, सचिन आदक आदींसह सर्व सदस्य आणि लघुउद्योजक सहभागी झाले होते. संघटनेद्वारे महावितरणच्या वीज बिलाची होळी करण्यात आली. ‘महावितरण’चे कार्यकारी अभियंते उदयचंद्र भोसले यांना निवेदनही देण्यात आले.
असोसिएशनद्वारे घेण्यात आलेल्या मोर्चात उद्योजक संजीव शहा, गोविंद पानसरे, लघुउद्योजिका दुर्गा भोर, कांचन पंत, जयश्री साळुंखे, विनीत मराठे, वैभव जगताप, विजय खळतकर, मिलिंद वराडकर आदींसह सर्व सदस्य सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने ‘महावितरण’च्या भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंते उदयचंद्र भोसले यांनी दरवाढ कमी करण्याचे निवेदन देण्यात आले.
संदीप बेलसरे म्हणाले, ‘‘महावितरणने ४० टक्के वीज गळती व चोरी होणारी वीज नियंत्रणात आणली तर वीज दरवाढ करण्याची गरजच भासणार नाही. महाराष्ट्र सरकारने पुढील चार वर्षाची प्रस्तावित वीजदर वाढीची रक्कम ६५ हजार कोटी रुपये हे टप्प्याटप्प्याने महावितरणला सबसिडी रूपात द्यावेत जेणे करून वीजदरवाढ होणार नाही व याचा फायदा हा लघुउद्योजकांना, व्यापाऱ्यांना व घरगुती वीज ग्राहकांना होईल.’’
अभय भोर म्हणाले, ‘‘सरकारची कुठेतरी खासगीकरणाकडे वाटचाल चालू आहे आणि त्याचा फटका उद्योजकांना बसत आहे. देशामध्ये इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्यात विजेचे दर हे गगनाला भिडले असून, विजेची चोरी सुद्धा महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात आहे. सरकारने वीज चोरी थांबवून आपला तोटा भरून काढावा. दरवाढीमुळे महाराष्ट्रातील उद्योजक कंटाळून परराज्यात जातील.’’
भोसरी ः महावितरणने केलेल्या प्रस्तावित दरवाढीविरोधात घेण्यात आलेल्या आंदोलनात पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेद्वारे वीज बिलांची होळी करण्यात आली.
भोसरी ः महावितरणने केलेल्या प्रस्तावित दरवाढीविरोधात घेण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेले फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य.