
दुर्धर आजारावर मात करण्यासाठी हवी सकारात्मकता
दुर्धर आजारावर मात करत ओमची ‘भरारी’
सेरेब्रल पाल्सी असलेला मुलगा ‘पॅरासेलिंग’मध्ये पारंगत
भोसरी, ता. २७ ः जन्माच्या दहा दिवसानंतर आलेल्या तापाच्या तपासणीत त्याला दुर्धर आजार झाला. त्यातच आलेली फीट आणि गेलेली दृष्टी. या आजाराने तो आयुष्यभर अंथरुणाला खिळून राहील, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, त्याच्या आईवडिलांनी धीर न सोडता, त्याच्यावर विविध उपचार तज्ज्ञांमार्फत केले. आज तो पॅरासेलिंगसह त्याची सर्व कामे स्वतः करतो. हा प्रेरणादायी प्रवास आहे दुर्धर आजारावर मात केलेल्या १७ वर्षाच्या ओम विष्णू शिंदे आणि त्याच्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या त्याच्या आईवडिलांचा.
ओम दहा दिवसाचा असताना त्याला ताप आला. त्यावर उपचार सुरू असतानाच त्याला फीट येऊन, तो बारा दिवस कोमात गेला. महिन्याभराच्या उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले. मात्र, पुन्हा त्याला फीट आल्यावर दवाखान्यात दाखल केले. त्यावेळेस त्याला सेरेब्रल पाल्सी, आॅटिझम आणि हायपर ॲक्टिव्हिटी या आजाराचे निदान झाले. त्यामुळे ओमचा मेंदू, कान, नाक, घसा, डोळे आदी अवयवांवरही त्याचा परिणाम झाला. त्याला जेवताही नीट येत नव्हते. बिछान्याला खिळलेल्या परिस्थितीत त्याच्यावर चार वर्षे उपचारासाठी त्याचे आईवडील धावपळ करत होते आणि त्यांच्या या अथक परिश्रमाला चौथ्या वर्षी यश मिळाले. सर्वसाधरण बालके वयाच्या दीड-दोन वर्षात चालायला लागतात. मात्र ओम हा चौथ्या वर्षी उभा राहायला शिकला आणि पाचव्या वर्षी अडखळत चालू लागला. आशेचा किरण पल्लवीत झालेल्या ओमच्या आईवडिलांनी त्याच्या डोळ्यांवरही तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले. ओमला लहान वयातच एका डोळ्याला तेरा तर दुसऱ्या डोळ्याला साडेबारा नंबरचा भिंगाचा चष्मा लागला. मात्र, आज ओमला एका डोळ्याला दोन तर दुसऱ्याला दीड नंबरचा चष्मा आहे.
ओमची आई जयश्री शिंदे आणि वडील विष्णू शिंदे यांनी धीर न सोडता, ओमच्या उपचाराकडे आणि त्याच्या सेवासुश्रषाकडे लक्ष देत त्याला स्वतःच्या पायावर उभे केले. आज ओमची शैक्षणिक क्षमता दुसरी-तिसरीची आहे. मात्र, तरी तो पॅरासेलिंग (छत्रीला दोर बांधून वाहनाच्या साह्याने आकाशात उडणे), न घाबरता करतो. आज स्वतःची सर्व कामे स्वतः करतो.
कोट
‘‘सेलेब्रल पाल्सीमध्ये बाळ गर्भात असताना मेंदूची वाढ आॅक्सीजन अथवा रक्ताच्या पुरवठ्याअभावाने खुंटते. जन्मानंतर मेंदूचा संसर्ग झाल्यावरही हा आजार होऊ शकतो. यात स्नायूची वाढ खुंटल्याने रुग्णाला तोल सावरता येत नाही. याचे सौम्य, मध्यम, गंभीर असे टप्पे असतात. यावर लाक्षणिक उपचार करावे लागतात. योग्य उपचार केल्यास या आजारावर काही प्रमाणात मात करता येऊ शकते. मात्र, शंभर टक्के आजार बरा होण्याची खात्री नसते.
डॉ. अनु गायकवाड, फिजिशियन, भोसरी
‘‘एखाद्या पाल्यास दुर्धर आजार झाल्यास पालक खचून जातात. मात्र दुर्धर आजारामध्ये पालकांनी खचून न जाता सकारात्मकता ठेवत योग्य उपचारासह सेवासुश्रुषा केली पाहिजे. प्रेमाचा सकारात्मक आधार दिल्यास विशेष बालकसुद्धा स्वयंपूर्ण होऊन स्वतःच्या पायावर उभे राहू शकते.
-जयश्री विष्णू शिंदे, आई.
फोटो १- भोसरी – पॅरासेलिंगचा आनंद घेताना ओम शिंदे.
फोटो २- ओम शिंदे
फोटो ः 00896, 00899