
भोसरीकरांनी अनुभवला बैलगाड्यांचा थरार आतिश राळे यांच्या बैलगाड्याला घाटाचा राजा सन्मान
भोसरी, ता. ८ ः श्री भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त भोसरीतील गावजत्रा मैदानात उत्सवप्रेमींना बैलगाड्यांचा थरार अनुभवायला मिळाला. आतिश राळे यांच्या बैलगाड्याने घाटाचा राजा सन्मान मिळवत चांदीची गदा पटकावली. मोशीच्या बबनराव गायकवाड यांच्या बैलगाड्याने प्रथम क्रमांक पटकाविला.
सकाळी अकराला आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे, माजी नगरसेवक रवी लांडगे, भाजपचे पिंपरी-चिंचवड सरचिटणीस विजय फुगे, भानुदास फुगे, मदन गव्हाणे, भानुदास लांडगे आदींच्या हस्ते बैलगाडा घाटाचे पूजन करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक पंडित गवळी, सागर गवळी, शेखर लांडगे, संतोष लांडगे, शिवाजी लांडगे, राहुल गवळी, विनय लांडगे, अशोक लांडगे, बाजीराव लांडे आदींसह उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते,
आतिश राळे यांच्या बैलगाड्याने शर्यत १२.३० सेकंदात पूर्ण करत घाटाचा राजा किताबासह चांदीची गदा पटकावली. अंतिम झालेल्या बैलगाडा शर्यतीत बबनराव गायकवाड यांच्या बैलगाड्याने १२.६० सेकंदात शर्यत पूर्ण करत पहिला क्रमांक मिळविला. चांदूसच्या आशिष राळे यांच्या बैलगाड्याने १२.७९ सेकंद घेत दुसरा क्रमांक पटकावला. तर कोय येथील माणिक सांडभोर यांच्या बैलगाड्याने १२.७९ सेकंदात शर्यत पूर्ण करत तिसरा क्रमांक मिळविला. माणिक सांडभोसर यांच्या बैलगाड्यास फळीफोडचा सन्मान मिळाला.
बैलगाडा शर्यतीत काटा निर्णयामध्ये निशान बहाद्दर म्हणून संदीप माने यांनी तर घड्याळ मास्तर म्हणून अशोक लांडगे व महेंद्र फुगे यांनी कामगिरी पार पाडली. सकाळी अकराला सुरू झालेल्या बैलगाड्यांच्या शर्यतीचा थरार सायंकाळी सहा वाजता थांबला.