कामगारांचे आरोग्य धोक्यात !

कामगारांचे आरोग्य धोक्यात !

संजय बेंडे ः सकाळ वृत्तसेवा
भोसरी, ता. २८ : पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुरेशी सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे भोसरी एमआयडीसीमध्ये काही लघुउद्योजकांद्वारे रस्त्याच्याकडेला कचरा टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्यांना कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उघड्यावरील कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. कचऱ्यामुळे फैलावणाऱ्या रोग, जंतूंमुळे कामगारांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. कचऱ्याबरोबर राडारोडाही टाकला जात असल्याने ‘एमआयडीसी’चे विद्रुपीकरण झाले आहे.

ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग
पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘इंदौर पॅटर्न’ अंतर्गत कचराकुंडी विरहित शहरासाठी भोसरी एमआयडीसीसह शहर परिसरातील सर्व कुंड्या हलविल्या आहेत. मात्र, काही लघुउद्योजकांद्वारे कंपनीतील टाकाऊ माल रस्त्याच्या कडेलाच फेकला जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हा कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचल्याचे पाहायला मिळत आहे. कचऱ्यामुळे रोगजंतूंची संख्याही वाढली आहे. सध्या एमआयडीसीत विविध भागात कंपन्या उभारण्याचे कामही सुरू आहेत. या कामातून निघणारा राडारोडाही रस्त्याच्याच कडेला आणून टाकला जात आहे. या राडारोड्यांचे ढीग रस्त्याच्या कडेला पडलेले दिसतात. त्यामुळे एमआयडीसी परिसराचे विद्रुपीकरण होत आहे.

जेसीबी आणण्याची वेळ!
भोसरीतील एस. ब्लॉक १८ मधील पुणे टेक्ट्रॉल कंपनीजवळील रस्त्याच्या कडेला गेल्या कित्येक वर्षापासून कचरा टाकला जात आहे. येथे साचलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे या रस्त्याला कचरा कुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काही वर्षापूर्वी येथील कचरा हलविण्यासाठी महापालिकेला जेसीबी आणावे लागले होते. याच ठिकाणी महापालिकेद्वारे कचरा व राडारोडा न टाकण्यासाठीचे फलक लावले आहेत. मात्र, या फलकाखालीच कचरा आणि राडारोडा टाकला जात असल्याने महापालिकेचे हसे होत आहे.

दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने कचरा उचलून नेण्यासाठीच्या ट्रकचे उद्‍घाटन थाटामाटात केले. मात्र, आठ दिवसानंतर हा ट्रक पेठ क्रमांक सातमध्ये दिसणे बंद झाले आहे. महापालिकेने कचराकुंड्याही नेल्या आहेत. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. महापालिका सुविधेच्या नावाखाली कर लावते. मात्र, त्या सुविधा पुरविल्या जात नाहीत.
- संजय सातव, लघुउद्योजक

कचरा उचलण्यासाठी महापालिकेने एखादे मध्यवर्ती ठिकाण निवडले पाहिजे. त्याचप्रमाणे इंडस्ट्रिअल वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.
- मिलिंद काळे, कंपनी अधिकारी

भोसरी एमआयडीसीमध्ये चार गाड्या सुरू केल्या आहेत. येत्या पंधरा दिवसांत एमआयडी परिसरातील रस्त्याच्याकडेला असलेले कचऱ्याचे ढीग उचलले जातील. धोकादायक कचऱ्याची विल्हेवाट कंपन्यांनाच लावण्यास सांगण्यात आले आहे.
- तानाजी दाते, सहायक आरोग्याधिकारी ‘क’ क्षेत्रीय कार्यालय

येथे टाकला जातोय कचरा
- ‘एस ब्लॉक १८, पुणे टेक्ट्रॉल कंपनीजवळील रस्ता
- पेठ क्रमांक सातमधील यशवंतराव चव्हाण चौक
- ‘एस-१३८’ ब्लॉकमधील शामा स्प्रिंग इंडस्ट्रीजजवळ
- ‘जे ब्लॉक’-३०७/१, सुप्रिम इंजिनिअरिंग कंपनीजवळील रस्ता
- पेठ क्रमांक ७, प्लॉट क्रमांक ५६, इलेक्ट्रॉनिक झोन, बीके इलेक्ट्रीकल्सजवळ
- पेठ क्रमांक ७, प्लॉट क्रमांक ९९, एनर्जी सिस्टेकजवळ
- ‘एस-९७ ब्लॉक’, साऊंड एन्सीलरी इंडस्ट्रीजजवळ
- शांतिनगरवरून इंद्रायणीनगरकडे जाणारा रस्ता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com