उन्हाळ्यातही वीज पुरवठा खंडित
लघुउद्योजक अडचणीत ः कामगारांना बसून वेतन देण्याची वेळ
 उन्हाळ्यातही वीज पुरवठा खंडीत

उन्हाळ्यातही वीज पुरवठा खंडित लघुउद्योजक अडचणीत ः कामगारांना बसून वेतन देण्याची वेळ उन्हाळ्यातही वीज पुरवठा खंडीत

संजय बेंडे ः सकाळ वृत्तसेवा
भोसरी, ता. ३ : पावसाळ्यात वीजपुरवठा विविध कारणांनी खंडित होतोच. मात्र; उन्हाळ्यातही तो खंडित होत असल्याने भोसरी एमआयडीसीतील लघुउद्योजकांच्या समस्या वाढल्या आहेत. कामगारांना बसून पगार देण्याबरोबरच उत्पादनही घटत असल्याने दुहेरी आर्थिक नुकसानीला त्यांना सामोरे जावे लागत आहे.
भोसरी ‘एमआयडीसी’तील विविध ब्लाॅकमधील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचा प्रकार घडतो. तो खंडित झाल्यावर सुरळीत होण्यासाठी दोन-तीन तास लागतात. आठवड्यातून दोन-तीन वेळा वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे लघुउद्योजकांच्या उत्पादनावरही परिणाम होत आहे. एक फेज बंद पडणे, विद्युत रोहित्रात बिघाड होणे, विद्युत केबल नादुरूस्त होणे आदींसह इतर कारणांमुळे पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत.

जनरेटर विकत घेण्याची वेळ!
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने काही लघुउद्योजकांनी जनरेटर विकत घेतले आहेत. तर; काहींना भाडेतत्त्वावर आणावे लागत आहेत. तर; काहींनी ज्या भागात कमी प्रमाणात विद्युत पुरवठा खंडित होतो, अशा ठिकाणी शॉप घेतले आहेत.
एस-२३४ ब्लॉकमध्ये नवीन कंपन्यांची कामे सुरू आहेत. या कंपन्यांना येथील जुन्याच रोहित्रामधून विद्युत जोड देण्यात येत असल्याने रोहित्रातही वारंवार बिघाड होत असल्याची तक्रार अक्षय रिठे या लघुउद्योजकाने केली.

‘‘गुळवेवस्तीतील सर्व्हे क्रमांक २३ मधील वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. पुढील कंपनीला वेळेवर माल पोचला नाही. तर; आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून दुसऱ्या ठिकाणीही शॉप घ्यावा लागला आहे.
- अमोल राणे, लघुउद्योजक.

भोसरी ‘एमआयडीसी’तील आनंदनगर इंडस्ट्रिअल इस्टेट सर्व्हे क्रमांक १५/७ आणि १५/८ मध्ये शंभर शॉप आहेत. येथे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. काही वेळेस दोन-दोन दिवस विद्युत पुरवठा खंडित राहतो. कनिष्ठ अभियंते फोन उचलत नाहीत. महावितरणच्या मोठ्या अधिकाऱ्यास फोन केल्यास, मला का थेट फोन केला, असा प्रश्न विचारतात. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.
- स्वदीप अडसूळ, लघुउद्योजक.

भोसरी ‘एमआयडीसी’मध्ये पूर्वीच्या तुलनेत विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कडक उन्हाळ्यात व पावसाच्या सुरवातीला तांत्रिक बिघाडामुळे विद्युत पुरवठा खंडित होतो. काही ठिकाणी खोदकामे सुरू आहेत. त्यामुळेही केबल तुटून विद्युत पुरवठा खंडित होतो. विद्युत पुरवठा नियमित होण्यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येईल.
- निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण.


२९ कोटींची कामांना मंजुरी
एमआयडीसी विद्युत यंत्रणा सुधारणा योजनेअंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील रामटेकडी, आकुर्डी, भोसरी, तळवडे व हिंजवडी एमआयडीसीमध्ये एकूण २९ कोटी २१ लाख रुपयांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली असून ही कामे सुरु करण्यात आली असल्याची माहिती महावितरणद्वारे देण्यात आली. या कामामध्ये ३७.४५ किलोमीटर नवीन भूमिगत उच्चदाब फिडर्स (वीजवाहिनी), १५ नवीन वितरण रोहित्र, ६६ नवीन रिंग मेन युनिट, १५५ नवीन फिडर पिलर्स आदी कामे करण्यात येत आहेत.

असा होईल सुरळीत पुरवठा..

- महावितरणने वाढत्या उद्योगांनुसार एमआयडीसीत यंत्रणा अद्ययावत करावी

- जुन्या झालेल्या केबल बदलाव्यात

- रोहित्राच्या क्षमतेपेक्षा अधिक वीज जोड देऊ नये.

- पावसाळ्यापूर्वी वीजपुरवठा खंडित न होण्यासाठी योग्य कार्यवाही करणे.

- महावितरणने दिलेल्या भ्रमणध्वनीवरील तक्रारींची तातडीने दखल घेणे.

- वीज चोरीमुळे अधिकचा दाब येत असल्याने वीज चोरीला आळा घालणे.

फोटो-
भोसरी एमआयडीसी ः एस-२३४ ब्लॉकमधील वारंवार बिघाड होत असलेले विद्युत रोहित्र.

फोटो ः 01050

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com