टाकाऊ वस्तूंचा करा ‘टिकावू’ वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाकाऊ वस्तूंचा करा ‘टिकावू’ वापर
टाकाऊ वस्तूंचा करा ‘टिकावू’ वापर

टाकाऊ वस्तूंचा करा ‘टिकावू’ वापर

sakal_logo
By

संजय बेंडे ः सकाळ वृत्तसेवा
भोसरी, ता. २५ ः तुम्हाला तुमच्या घरातील ज्या वस्तू टाकून द्यायच्या आहेत, त्या टाकून देण्यापेक्षा तुम्ही महापालिकेच्या ‘आरआरआर’ प्रकल्पात जमा केल्यास त्यांचा वापर गरजूंना होऊ शकतो. या महापालिकेच्या उपक्रमास शहरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, ‘क’ आणि ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आतापर्यंत तीन हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. त्यांच्याकडून सुमारे चारशे किलो वस्तू संकलित झाल्या आहेत. ही मोहीम पाच जूनपर्यंत राबविण्यात येत आहे.

‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ आणि केंद्र सरकारच्या ‘भारत स्वच्छ सर्व्हेक्षण २०२३’ मोहिमेअंतर्गत आरआरआर ही योजना २० मे पासून पाच जूनपर्यंत राबविण्यात येत आहे. ‘वस्तू कमी करा, पुन्हा वापर करा, पुनर्निर्माण’ म्हणजेच आरआरआर प्रकल्प होय. या योजनेअंतर्गत घरातील वापरात नसलेले कपडे, चप्पल, बूट, खेळणी, बॅग, पर्स, ई-कचरा, भांडी, प्लास्टिकच्या वस्तूंसह इतरही वापरात नसलेल्या वस्तू महापालिकेद्वारे विविध संकलन केंद्रात स्वीकारण्यात येणार आहेत. पाच जूननंतर जमा झालेल्या या वस्तू स्वच्छ या संस्थेस देण्यात येणार आहेत. त्यानंतर महापालिका आणि ‘स्वच्छ’ संस्थेद्वारे या वस्तू आरआरआर अंतर्गत गरजूंना देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे वापरात न येण्याजोग्या वस्तूंचे पुनर्निर्माण केले जाणार आहे.
या मोहिमेसाठी महापालिकेद्वारे नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे नागरिकांच्या घरातील वापरात न येणाऱ्या वस्तूंची संख्या कमी होणार आहे. त्याचप्रमाणे या वस्तूंचा गरजूंनाही फायदा होणार आहे. त्यामुळे या मोहिमेचे नागरिकांद्वारे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळे २० ते २४ मे या अवघ्या पाच दिवसांमध्ये तीन हजार सातशे तीन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या मोहीमेस मिळाला आहे.

इथे स्वीकारल्या जातात वस्तू
‘क’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत जाधववाडीतील रामायण मंदिराजवळ, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर क्रीडा संकुल, नेहरूनगर दवाखान्याजवळ आदी महापालिकेच्या आरोग्य कार्यालयांमध्ये वस्तू संकलित केल्या जात आहेत. ई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मोशीतील छत्रपती संभाजी महाराज भाजी मंडई, भोसरीतील कै. सखूबाई गवळी उद्यान, सहल केंद्र, दिघीतील ममता स्वीट चौक आदी ठिकाणी या वस्तू संकलित केल्या जात आहेत.

संकलित वस्तू (किलोग्रॅमध्ये)
क्षेत्रीय कार्यालयाचे नाव ः कपडे ः बूट/चप्पल ः खेळणी ः इ-कचरा ः पुस्तके ः भांडी ः नागरिकांची संख्या
क ः २५२.३ ः ४९.७ ः ५.२ ः ३.८ ः ३०.५ ः ६.२ ः ५३
इ ः ४५.३ ः १६ ः ० ः ०.४ ः २१.९ ः ० ः ३६५०
एकूण ः २९७.६ ः ६५.७ ः ५.२ ः ४.२ ः ५२.४ ः ६.२ ः ३७०३


‘‘ई प्रभागातील प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच, सातमध्ये संकलन केंद्रे तयार करण्यात आली आहेत. संकलित केलेल्या चांगल्या वस्तू गरजूंना वापरण्यास देण्यात येणार आहेत. नागरिकांचा या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.’’
- राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी, ई प्रभाग

‘‘स्वच्छ सर्व्हेक्षणाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेमध्ये वापरात नसलेल्या वस्तूंचे संकलन करून त्या गरजूंना देण्याबरोबरच त्या वस्तूंच्या पुनर्वापरासाठी त्यांचे पुनर्निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.’’
- अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी, क प्रभाग