
पालखी मार्गावरील अडथळा दूर करण्याची मागणी
भोसरी, ता. २८ ः संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर पडलेली डच, सिमेंट कॉंक्रिटचा राडारोडा, रस्त्यावरील न भरलेल्या चरीमुळे पडलेला खड्डा यामुळे वारकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पालखी मार्गावरील गैरसोय दूर करण्याची मागणी भाविक आणि नागरिकांमधून होत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा ११ जूनला दिघीतील पुणे-आळंदी रस्त्याने पुण्यातील विसाव्यास्थळी मार्गस्थ होणार आहे. चऱ्होली ते दिघीतील जुना जकातनाक्यापर्यंतच्या रस्त्याचे यापूर्वीच रुंदीकरण झाल्याने पालखी मार्ग प्रशस्त झाला आहे. मात्र, असे असतानाही पालखी मार्गावर काही ठिकाणी दुरवस्थेमुळे गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आळंदी-पुणे महामार्गावर चऱ्होलीत आनंदवनच्या विरुद्ध बाजूवरील रस्त्यावर डच पडली आहे. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराजवळील रस्त्यावर सिमेंट कॉंक्रिटचा राडारोडा पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे दिघीतील लष्करी हद्दीतून जाणारा जुना जकात नाका ते डीआरडीओपर्यंतचा रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावर पाइपलाइन टाकण्याच्या कामानंतर रस्त्यावर पडलेल्या चरीचे डांबरीकरण न झाल्याने रस्त्यावर खड्डा पडला आहे. त्याचप्रमाणे या रस्त्याच्या साइडपट्ट्याही भरल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे पालखी मार्गावरील वारकरी आणि वाहनांना याचा अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
‘‘पिंपरी-चिंचवड महापालिकेने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी करून पालखी मार्गावरील अडथळे दूर करणे गरजेचे आहे. पालखी मार्गावर उभारलेल्या विविध प्रतिकृतींवर साचलेल्या धुळीची स्वच्छता करून काही ठिकाणी रंगरंगोटीही केली पाहिजे.’’
- संजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, दिघी