पर्यावरण संवर्धनाची ‘ग्रीन यात्रा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरण संवर्धनाची ‘ग्रीन यात्रा’
पर्यावरण संवर्धनाची ‘ग्रीन यात्रा’

पर्यावरण संवर्धनाची ‘ग्रीन यात्रा’

sakal_logo
By

भोसरी, ता. ५ : पर्यावरण संर्वधनासाठी वृक्षारोपण हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. याचाच विचार करत पुण्यातील ग्रीन यात्रा संस्था पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने एक प्रकल्प राबवीत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत संस्थेने आळंदी रस्त्यावरील कै. रामभाऊ गबाजी गवळी बालोद्यानात ९० हजार झाडांची लागवड केली आहे.

यामध्ये सह्याद्री पर्वत रांगामधील देशी-जंगली प्रकाराची झाडे आहेत. यामुळे पश्चिम घाटातील वनराईचा समृद्धपणा अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. महापालिकेने वृक्षारोपनासाठी कै. रामभाऊ गबाजी गवळी बालोद्यानाची जागा संस्थेला दिली आहे. तर संस्थेला या प्रकल्पासाठी व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) अंतर्गत काही कंपन्यांद्वारे आर्थिक मदत केली जात आहे. गेल्या वर्षी ३१ मार्चला या ठिकाणी पस्तीस हजार रोपांच्या लागवडीचा कार्यक्रम पूर्ण झाला. या लागवडीमुळे बालोद्यानाचा परिसर हिरवाईने नटला आहे. या उद्यानात प्रथम जमिनीचे सपाटीकरण करून रोपांना पोषक असा मातीचा पोत तयार करत या झाडांचे रोपण करण्यात आले आहे. रोपांना काठ्यांचा आधार दिला आहे. त्याचप्रमाणे रोपांना देण्यात येणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन थांबविण्यासाठी, मातीत गारवा टिकविण्यासाठी मातीवर सुकलेले गवत पसरविले आहे.

सह्याद्री जैववैविधता उद्यान
विविध झाडांच्या लागवडीमुळे येथे विविध पक्षी, फुलपाखरांसह इतर प्राण्यांचा अधिवासही तयार होणार आहे. त्याचप्रमाणे येथे करवंदे, बोर, आवळा, निरगुंडी, उंबर, कोकम आदी रानमेवा देणारी झाडे तर अडुळसा, आवळा, हरडा, बहिरडा, कडुनिंब, अर्जुन, काटेशावर, तमन, आपटा, महू आदी औषधी वनस्पतींचा समावेश आहे. सोनचाफा, पलाश, कांचन, बाहवा, रिटा, कनेर, पारिजात सेफाली आदी फूल झाडे आहेत. याचप्रमाणे पिंपळ, वड, कदंबा, बांबू आदी सावली देणाऱ्या झाडांचाही समावेश आहे.

नामशेष होणाऱ्या झाडांचाही समावेश
उद्यानात नामशेष होणाऱ्या यादीत असणाऱ्या रिटा, कोकम आदींसह इतर दुर्मिळ झाडांचाही समावेश आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक झाडाला क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. नागरिक, विद्यार्थ्यांना या कोडद्वारे झाडांची संपूर्ण माहिती प्राप्त होणार आहे. येथे सह्याद्री पर्वत रांगेतील गवताचे गालिचे, नवग्रह, राशी उद्यान व पंचवटी वाटिकाही तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्रिपाठी यांनी दिली.

एक चौरस मीटरमध्ये चार रोपे
प्रत्येक चौरसमीटरवर चार वेगळ्या प्रकारची रोपे लागवड केली आहे. यामध्ये एक रोप पन्नास फुटापेक्षा अधिक उंचीवर वाढणारे, दुसरे पन्नास फुटापेक्षा कमी, तर तीस फुटापेक्षा अधिक उंचीपर्यंत वाढणारे, तिसरे वीस ते तीस फुटापर्यंत वाढणारे, तर चौथे झुडूप या प्रकारातील वीस फुटापेक्षा कमी उंचीवर वाढणाऱ्या रोपांची लागवड केली आहे. गेल्या वर्षी पहिल्या टप्प्यात या उद्यानात पस्तीस हजार झाडे तर, दुसऱ्या टप्प्यात ५५ हजार झाडे लावण्यात आली आहेत.

‘‘भोसरीतील कै. रामभाऊ गबाजी बालोद्यानात ग्रीन यात्रा संस्थेद्वारे वृक्षारोपन करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेद्वारे संस्थेला जागा उपलब्ध करून दिली आहे. तर येणारा खर्च ग्रीन यात्रा संस्थेद्वारे सीएसआर अंतर्गत करण्यात येत आहे. तसेच याच उद्यानाचे संस्थेद्वारे बटरफ्लाय गार्डन व तळ्याचे नियोजनही करण्यात येत आहे. तीन वर्षानंतर झाडांच्या संगोपनासाठी हे उद्यान संस्थेद्वारे महापालिकेला हस्तांतरित करण्यात येणार आहे.’’
- राजेश वसावे, सहायक उद्यान अधीक्षक, महापालिका.

‘‘सर्वसाधारण एका वर्षात झाडाची उंची तीन ते चार फुटापर्यंत वाढते. मात्र ग्रीन यात्रा संस्थेद्वारे मातीचा पोत, झाडांची योग्य घेतलेल्या काळजीमुळे भोसरीतील कै. रामभाऊ गबाजी गवळी उद्यानात गेल्या वर्षी लावलेल्या झाडांची उंची आठ ते दहा फुटापर्यंत वाढली आहे. येथील मातीचा पोतही सुधारला आहे.’’
-प्रदीप त्रिपाठी, संस्थापक, ग्रीन यात्रा संस्था. ‌

‘‘ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या साहाय्याने ग्रीन यात्रा संस्थेद्वारे भोसरीतील रामभाऊ गबाजी गवळी उद्यानात करण्यात आलेल्या वृक्षरोपणामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ हवा मिळणार आहे. असाच उपक्रम महापालिकेने इतर उद्यानातही राबवणे गरजेचे आहे.’’

- अॅड. सचिन गोडांबे, सामाजिक कार्यकर्ते