चिखलीतील नागरिक पाणीटंचाईमुळे त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिखलीतील नागरिक 
पाणीटंचाईमुळे त्रस्त
चिखलीतील नागरिक पाणीटंचाईमुळे त्रस्त

चिखलीतील नागरिक पाणीटंचाईमुळे त्रस्त

sakal_logo
By

चिखली, ता. २ ः येथील मोरे वस्ती, मेहेत्रे वस्ती परिसरातील कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, पाण्याअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पाणी विकत घेऊन किंवा महापालिका तसेच काही सामाजिक संस्थेच्या मदतीने टँकर मागून या भागातील नागरिक आपली पाण्याची तहान भागवत आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून मोरे वस्ती, मेहेत्रे वस्ती या परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने तसेच वेळी अवेळी पाणीपुरवठा केला जात आहे. हंडाभर पाण्यासाठी नळ जोडासमोर अर्धा ते पाऊण तास उभे राहावे लागते. त्यातच दिवसाआड पाणी येत असल्याने दोन दिवसांसाठी पाणी साठवून ठेवण्याकरिता महिलांना चांगलीच धावपळ करावी लागत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहतो. पूर्वी पहाटे सहा वाजता पाणी आल्यावर कामगारांना पाणी भरून कामावर जाणे सहज शक्य होत होते. मात्र, आता सकाळी नऊ, दहा किंवा बारा वाजेपर्यंत, कधीही अवेळी पाणी येत असल्याने अर्ध्याहून अधिक रहिवाशांना पाणी मिळणे अशक्य होत आहे. आर्थिक भुर्दंड सहन करत पाणी विकत घेऊन रहिवाशांना आपली तहान भागवावी लागत आहे. याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने आणि शिवसेना उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांनी पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे.

‘‘मोरे वस्ती येथील अष्टविनायक चौक परिसरात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते, ते आता पूर्ण झाले आहे. काही परिसरात पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. जलवाहिनी टाकल्याने आता तो सुरळीत होईल.’’
- रामनाथ टकले, पाणीपुरवठा अधिकारी, महापालिका