
वाळू उपसा करणाऱ्यांवर देहूमध्ये कारवाई
देहू, ता. २४ : येथील इंद्रायणी नदी पात्रात अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्यांवर शनिवारी (ता. २४) पहाटे तीन वाजता पिंपरी-चिंचवडच्या अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांनी त्यांच्या सहकारीसह कारवाई केली.
राज्यात अनेक ठिकाणी अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्यांकडून महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जीवघेणे हल्ल्याच्या घटना घडत आहेत. सरकारने अशा बेकायदा वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. देहू इंद्रायणी नदी पात्रात अनधिकृत वाळू उत्खनन चालू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तहसीलदार गीता गायकवाड यांनी आज पहाटे तीन वाजता आपल्या सहकाऱ्यांसह डंपरमध्ये बसून वाळू उत्खनन चालू असलेल्या ठिकाणी प्रवेश केला. या युक्तीमुळे वाळू उत्खनन करणारे गाफील राहिले. त्यामुळे या ठिकाणी कारवाई यशस्वीरीत्या पार पडली. या कारवाईमध्ये तीन ट्रॅक्टर, दोन पोकलेन याप्रमाणे पाच मशिनरी जप्त करून देहूरोड पोलिस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहेत. ही कारवाई जिल्हाधिकारी राजेश देशमुख, प्रांताधिकारी संजय आसवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत तहसीलदार गीता गायकवाड, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, मंडलाधिकारी शेखर शिंदे, मंडलाधिकारी बाबा साळुंके, देहूगाव तलाठी सूर्यकांत काळे, मोशी तलाठी अतुल गीते, महसूल सहायक उन्मेष मुळे, महसूल सहायक महेश गायकवाड, पोलिस पाटील चंद्रसेन टिळेकर, पोलिस पाटील सुभाष चव्हाण, शिपाई तुषार सोनवणे, शिपाई रोहीत चक्रनारायण, चालक ज्ञानेश्वर गोठे सहभागी होते.