
ऐतिहासिक धम्मभूमीत हजारो बौद्ध बांधव नतमस्तक
देहूरोड, ता. २६ : बौद्ध बांधवांची पंढरी समजल्या जाणाऱ्या देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहार, धम्मभूमीचा ६८ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. देशातील विविध भागातून आलेल्या हजारो बौद्ध बांधवांनी भगवान बुद्धांच्या मूर्तीचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तुपाचे दर्शन घेण्यासाठी रांग लावली होती.
देहूरोड शहरातील विविध संस्था, संघटनांनी आलेल्या भाविकांच्या स्वागतासाठी कमानी उभारल्या होत्या. तसेच अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. २५ डिसेंबर १९५४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक धम्मभूमी, बुद्धविहारात गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्व हस्ते स्थापना करून धम्मक्रांती केली. यानिमित्त देशातील हजारो बौद्ध बांधव दरवर्षी देहूरोड येथे येतात. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण देहूरोड शहरात उत्साहाचे वातावरण होते. बुद्धविहार कृती समितीच्या वतीने बाजारपेठेतून रेली काढण्यात आली. सकाळी डॉ. राजाराम बडगे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण झाले. रेल्वे मैदानावर महाबुद्धवंदना झाली. सयाजीराव गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. विजय जाधव यांना प्रबुद्धरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डॉ. महेश देवकर यांना पालीरत्न, शिवशरण धम्मरत्न, गोविंद गायकवाड यांना साहित्यरत्न, सुरेश गायकवाड यांना क्रांतीरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. टेक्सास गायकवाड, कीर्तीपाल गायकवाड, धर्मपाल तंतरपाळे, अशोक गायकवाड, अशोक सोनवणे, अरुण जगताप व इतर उपस्थित होते. दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया, आरपीआय देहूरोड, भारतीय बौद्ध महासभा यांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. देहूतील प्रज्ञा बुद्धविहार, बहुजन समाज पक्षांनी अन्नदानाचे आयोजन केले होते.