
तुकोबांच्या विचारांची चित्रफीत बनवून देऊ
देहू, ता. ७ : ‘‘संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज सर्वांच्या अंतःकरणात आहेत. चारशे वर्षांपासून संत तुकाराम महाराज यांचे विचार समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करीत आहेत. अभंगातून तुकाराम महाराज यांनी चुकीच्या गोष्टींवर प्रहार केला. ढोंगीपणा, अनितीवर परखडपणे विचार मांडले. घरोघरी तुकोबांचे विचार आणि संदेश पोचविणारी वीस मिनिटांची चित्रफीत बनवून देऊ,’’ असे आश्वासन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी देहू येथे दिले.
संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्यातील प्रसंग चित्रण यावरील दिनदर्शिका प्रकाशन सोहळा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते देहूत झाला. त्यावेळी शरद पवार बोलत होते. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, उल्हास पवार, आमदार दिलीप मोहिते, सुनील शेळके, जयंत म्हैसकर, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, प्रकाश म्हस्के, गणेश खांडगे उपस्थित होते.
नितीन महाराज मोरे म्हणाले, ‘‘संत तुकाराम महाराज यांचे जीवन चित्रफितरुपात भक्तनिवास येथे पाहण्यासाठी भाविकांना उपलब्ध व्हावा. त्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा.’’
उल्हास पवार यांनी मनोगत व्यक्त केले. शेगावचे चित्रकार रूपेश मिस्त्री यांनी संत तुकाराम महाराज यांची विविध चित्रे दिनदर्शिकेत काढली आहेत. शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. विकास कंद यांनी सूत्रसंचालन केले. आमदार सुनील शेळके यांनी आभार मानले.