
प्रगती विद्यालयात मराठी दिन उत्साहात
इंदोरी, ता. २८ ः प्रगती विद्यालय व आ.ना.काशीद पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा झाला. प्रमुख अतिथी माजी मुख्याध्यापिका कुसुम वाळूंज व संस्थेचे माजी विद्यार्थी कॅप्टन वैभव शेप यांचे हस्ते कुसुमाग्रजांचे प्रतिमा पूजन झाले. ढोल व लेझीमच्या निनादात ग्रंथ दिंडी मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. ग्रंथ दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात शिरवाडकर यांच्या ग्रंथसाहित्याचा समावेश होता. ग्रंथ दिंडी मिरवणुकीत शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी सहभागी झाले होते. मराठी राजभाषा दिनानिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. मराठी भाषेची महानतेवरील गीते विद्यार्थ्यांनी सादर केली. ग्रंथ दिंडी मिरवणुकीनंतर शालेय समिती अध्यक्ष दामोदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. यावेळी कुसुम वाळूंज यांनी मनोगतातून मराठीचा गोडवा व श्रेष्ठत्व विविध दाखल्यांसह स्पष्ट केले. प्रास्ताविक व स्वागत लक्ष्मण मखर यांनी केले. सूत्रसंचालन वैजयंती कुल यांनी केले. नियोजन राजेंद्र वाजे व दीपक डांगले यांनी केले. आभार प्राचार्य सुदाम वाळूंज यांनी मानले.