रावेत येथील लक्ष्मीनगरमधील मुख्य रस्ता उखडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रावेत येथील लक्ष्मीनगरमधील मुख्य रस्ता उखडला
रावेत येथील लक्ष्मीनगरमधील मुख्य रस्ता उखडला

रावेत येथील लक्ष्मीनगरमधील मुख्य रस्ता उखडला

sakal_logo
By

किवळे, ता.४ ः रावेत येथील लक्ष्मीनगरमधील एक किलोमीटरपर्यंतचा मुख्य रस्ता उखडल्याने वाहन चालकांची गैरसोय होत असून त्याच्या डांबरीकरणाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धूळ आणि उडणाऱ्या खडीमुळे वाहन चालक संताप व्यक्त करत आहेत.
रेल्वे मार्गाजवळील मस्केवस्ती ते रावेत गाव बीआरटी या मुख्य रस्त्याला एस.बी.पाटील महाविद्यालयाजवळ लक्ष्मीनगर हा १८ मीटरचा रस्ता जोडलेला आहे. पूर्वेला हा रस्ता शिंदेवस्ती येथील मुख्य रस्त्यास जोडला आहे. रस्ता ठिकठिकाणी उखडला असून वाहन चालकांना या मार्गाने जाताना बैलगाडी चालवत असल्याचा अनुभव येत आहे. खड्ड्यांमुळे खडी सर्वत्र पसरलेली आहे. या मार्गावर एस.बी.पाटील महाविद्यालयामुळे तसेच परिसरात वाढलेल्या गृहसंकुलांमुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खराब रस्त्यामुळे एकीकडे वाहन चालकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे खडीमुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे, या रस्त्याची स्थापत्यकडून लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी मागणी परिसरातील गृहसंकुलांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.

रस्ता करतानाच प्रशासनाने लक्ष द्यावे
‘‘रस्त्याचे ठेकेदार कंपनीमार्फत डांबरीकरण झाल्यानंतर काही अवधीतच रस्ता उखडत असेल आणि तो पुन्हा करावा लागत असेल. तर पालिकेचे हे एका दृष्टीने आर्थिक नुकसान आहे. त्यामुळे, रस्ता करताना डांबरीकरणाचे सर्व थर काळजीपूर्वक केले जातात का ? आणि डांबरीकरण मंजूर निविदेतील अटी शर्थी नुसार होते का ? याबाबत पालिकेच्या स्थापत्य विभागाने लक्ष द्यावे,’’ असे दिवाणजी भोंडवे-पाटील, मनोहर भोंडवे, विजय शिंदे, अक्षय शेटे, तुकाराम रांजणे आदी स्थानिक रहिवाशांनी म्हटले आहे.

‘‘ लक्ष्मीनगरमधून गेलेल्या या रस्त्याखालील जमीन सखल आणि काळवट असल्याने रस्ता खचतोच. तो पुनः (रिसर्फेसिंग) करावा लागेल. यादृष्टीने कार्यवाही करू.’’ - प्रशांत पाटील, अभियंता, स्थापत्य विभाग ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय