
शिंदेवस्तीचा रस्ता झाला चकाचक
किवळे, ता. १० : रावेतच्या शिंदेवस्तीमधील रस्त्याच्या दोन्ही बाजूचे पदपथ पालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाकडून चकाचक करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
शिंदेवस्ती येथे लोहमार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाडांच्या कचऱ्याचा ढीग झाला होता. तो अनेक दिवस उचलण्यात न आल्याने याठिकाणी नागरिक कचराही टाकू लागले होते. त्यामुळे परिसर सौंदर्यात बाधा येऊ लागली होती. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करून आरोग्य विभागाचे लक्ष वेधले होते. शनिवार आणि रविवारी अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात आल्याने येथील दत्त मंदिरासह लोहमार्गाच्या दिशेला परिसर चकाचक दिसत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे, अशी स्वच्छता कायम राहावी अशी अपेक्षा मनोहर भोंडवे, सचिन भोंडवे, सोमनाथ भोंडवे यांनी व्यक्त केली.
kiw9002p1 :
शिंदेवस्ती रावेत ः आरोग्य विभागाकडून स्वच्छता करण्यात आल्याने चकाचक झालेला रस्ता.