
तृणधान्य, भरडधान्याचा आहारामध्ये वापर वाढवा
किवळे, ता. १७ : कृषी विभागामार्फत किवळे व वाल्हेकरवाडी येथे ‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३’ या निमित्ताने जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. कृषी पर्यवेक्षक आरिफ शेख, कृषी सहायक मनीषा शिरसाट, कृषी सहायक सचिन साबळे, जिजाऊ फाउंडेशन अध्यक्षा ज्योती भालके, प्रगतशील शेतकरी संदीप भालके उपस्थित होते.
तुमच्या आहारामध्ये तृणधान्य, भरडधान्य यांचा वापर वाढावा व त्यांच्या मूल्यांविषयी जनजागृती सर्वांमध्ये निर्माण व्हावी, याकरिता प्रत्येकाने दूतासारखे काम करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
‘मंथली मंथ ऑफ मिनिट’ या संकल्पनेवर आधारित जानेवारी हा महिना बाजरी या पिकासाठी घोषित करण्यात आला आहे. आहारामध्ये जास्तीत जास्त बाजरी पिकाचा वापर वाढावा आणि बाजरी पिकातील पोषणमूल्य विषयी माहिती यावेळी देण्यात आली.
शेतकऱ्यांनी तृणधान्य पिकाखालील क्षेत्र वाढवावे, जेणेकरून वाढत्या मागणीप्रमाणे पुरवठा आपल्याला करता येईल. दैनंदिन जीवनामध्ये वाढत जाणारे आजार जसे की कोलेस्ट्रॉल वाढणे, वजन वाढणे, बीपी सोबत हार्ट अटॅक यांसारख्या रोगांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आहारात मुबलक प्रमाणात तृणधान्य व भरडधान्यांचा वापर केला पाहिजे, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक आरिफ शेख यांनी केले.
kiw17001p1 :