
छापील लग्नपत्रिका कालबाह्य होण्याच्या मार्गावर
करंजगाव, ता. १० ः कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला. त्यात प्रिटींग क्षेत्र अपवाद उरले नाही. सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे, मात्र, कोरोनानंतरच्या काळात छापील लग्नपत्रिका निमंत्रण म्हणून घरी जाऊन देण्याची पद्धती जवळपास कालबाह्य झाली आहे. लग्नापूर्वी आठवडाभर सलग दोन-तीन दिवस डिजिटल पत्रिका व्हॉटसॲपवरून पाठविली जाते. तेच निमंत्रण समजून लग्नाला हजेरी लावण्यावर वऱ्हाडी मंडळींचा भर आहे.
कोरोनाच्या संसर्गानंतर जगातील सर्वच क्षेत्राचे गणित बिघडले आहेत. दिवाळीनंतर ते पावसाळा सुरू होण्याच्या सुरुवातीपर्यंत लग्नसराईचे दिवस असतात. याच काळात मुहूर्त पाहून अनेक जोडपी विवाह बंधनात अडकतात. लग्नसराईमुळे अनेक व्यवसायाला याच काळात गती मिळत असते. यात फोटोग्राफरपासून ते लग्नपत्रिका छापण्यापर्यंत सर्वांचा हंगाम असतो. मात्र, दोन वर्ष कोरोनामुळे सर्वांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे कोरोना काळात मर्यादित संख्येमध्ये लग्न समारंभ झाले. कोरोनाचा निर्बंध उठल्यानंतर विवाह पुन्हा जोरदार सुरू झाले आहेत. मात्र, अजूनही पत्रिका छापल्या जात नाही. हजारांमध्ये छापल्या जाणाऱ्या पत्रिकांची संख्या दोन अंकी आकड्यांमध्ये आली आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाला एक वेगळे महत्त्व आहे. जोडपी लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले जातात आणि नव्या आयुष्याला सुरुवात करतात. नव्या आयुष्याची सुरुवात धुमधडाक्यात केली जाते. नातेवाईक, मित्र मंडळी, आप्तेष्ट यांना लग्नपत्रिका देऊनच लग्नाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले जायचे. घरी येऊन किंवा हातोहाती पत्रिका घरपोच आली तरच ते निमंत्रण समजले जायचे. त्यामुळे लग्नाअगोदर महिनाभराचा काळ लग्नपत्रिका वाटण्यात जात अस. तसेच त्याची संख्याही हजारांच्या पुढचे असायची. कोरोनानंतर मात्र, आता घरपोच पत्रिका देण्याची पद्धत जवळपास बंदच झाली आहे. आता व्हॉटसॲपवर पत्रिका सेंट केली जाते, तेच निमंत्रण समजून वऱ्हाडीमंडळी लग्नाला हजेरी लावत आहेत. कोरोना काळात लग्न समारंभाला उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे लग्नपत्रिकांची जागा डिजिटल पत्रिकेने घेतली.
खर्चात बचत
लग्नाचे स्वरूप पूर्वीप्रमाणे सुरू झाले. परंतु छापील लग्नपत्रिकेची मानसिकता सध्याच्या काळात राहिली नाही. डिजिटल पत्रिकाच पसंतीस पडली आहे. व्हॉटसॲप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून निमंत्रण क्षणात सर्वांपर्यंत पोचवणे शक्य होत आहे. त्यामुळे गावोगावी पत्रिका देणे अपेक्षित राहिले नाही. त्यामुळे निमंत्रण देण्यासाठी लागणारा वेळ, पैसा यात बचत होत आहे. पूर्वी ग्रामीण भागात सरासरी वधू-वर पक्षाकडून प्रत्येकी एक-एक हजार पत्रिका छापल्या जात असे. एक हजार पत्रिकेसाठी दहा हजार रुपये खर्च करावा लागत होता. मात्र, आता ग्राहकांची कमी कार्डांची मागणी असते. डिजिटल निमंत्रण पत्रिकेची मागणी अन् खर्चात बचत असे चित्र निर्माण झाले आहे.
‘‘काही हौशी लोक निदान जवळच्या नातेवाइकांना पत्रिका दिली पाहिजे किंवा पत्रिका ही एक संस्कृतीचा भाग आहे, असे मानून पत्रिका छापतात. मात्र, एक ग्राहक ५० ते १०० कार्डचीच छापून देण्याची मागणी करतो. एकंदरीत निमंत्रण पत्रिका कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.
- श्रीरंग गोडे, प्रिंटिंग प्रेस मालक
ग्राफिक डिझायनरला मागणी वाढली
डिजिटल पत्रिका व बॅनरसाठी ग्राफिक डिझायनरची मागणी वाढली आहे. पत्रिका, वाढदिवस, सण आदींच्या डिझाइन बनविण्यासाठी अनेक जण दोन हजार ते पाच हजारांपर्यंत मंथली पॅकेज देतात.
Web Title: Todays Latest Marathi News Kjg22b00327 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..