कामशेतमध्ये तरुणीवर कोयत्याने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
कामशेतमध्ये तरुणीवर कोयत्याने वार

कामशेतमध्ये तरुणीवर कोयत्याने वार

कामशेत - माझ्या मित्राबरोबर लग्न करण्यास नकार का दिला? असे म्हणत २० वर्षीय तरुणीवर एका तरुणाने कोयत्याने वार केले. ही घटना सोमवारी (ता.३१) पहाटे पावणे सहाच्या सुमारास इंद्रायणी कॉलनीत घडली. या हल्ल्यात फिर्यादी तरुणीच्या हाताला जखम झाली आहे.

या प्रकरणी सुनील रामदास ढोरे (वय २२, रा. मोरया कॉलनी, वडगाव मावळ) व एक अनोळखी आरोपी (वय अंदाजे २० ते २५) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संबधित तरुणीने कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी कचऱ्याची पिशवी कचराकुंडीत टाकत असताना एका अनोळखी आरोपीने फिर्यादीच्या मानेवर अचानक वार केला. त्यावेळी या तरुणीने मागे वळून पाहिले असता आरोपीने माझा मित्र सुनील ढोरे याच्याशी लग्न करण्यास का नकार दिला? असे म्हणून हातातील धारदार कोयत्याने मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. तो कोयता फिर्यादीने दोन्ही हातांनी धरला. त्यानंतर, आरोपीने कोयता जोरात ओढल्याने फिर्यादीच्या दोन्ही हातांना दुखापत झाली.