
सांगिसे गावात बिबट्याचे दर्शन
कामशेत, ता. २८ ः नाणे मावळातील सांगिशे गावामध्ये बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शुक्रवारी (ता. २७) रात्री अकराच्या सुमारास गावातील एका वीट भट्टीवर असलेल्या कामगारांनी बिबट्या आल्याचे गावातील लोकांना सांगितले. त्यानंतर गावातील माणसांनी बिबट्याची माहिती वनविभागाला दिली.
वन विभागाने कोणताही अनुचित प्रकार घडण्याअगोदर सर्च ऑपरेशन करून व पिंजरा लावून बिबट्याला पकडावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे. या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन, परिसराची पाहणी करून वन विभागाकडून पाहणी करण्यात आली. यावेळी रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर अंगणात झोपू नये, पाळीव जनावरे बंदिस्त जागेत बांधावीत, अशी सूचना वन विभागाने स्थानिक नागरिकांना दिली.
बिबट्याचा वावर हा वन परिसराजवळील जागेत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन शिरोता वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी सुशील मंतावर यांनी केले आहे.