
आई एकवीरा गड सज्ज
लोणावळा, ता. २५ : नवरात्रौत्सवानिमित्त श्री एकवीरा देवस्थान तसेच खंडाळा येथील श्री वाघजाई देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांच्या स्वागतासाठी देवस्थान सज्ज झाले आहे. लोणावळा परिसरातील मंडळाच्या वतीनेही पारंपरिक पद्धतीने दुर्गेची भक्तीमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. कोळी, आगरी भाविकांसह असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वेहेरगाव, कार्ला येथील श्री एकवीरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची वर्षभर गर्दी होत असते.
आश्विन शुद्ध प्रतिपदेस (ता.२६) सकाळी वेहेरगाव येथील एकवीरा देवीच्या गडावर घटस्थापना होणार आहे. गेली दोन वर्षे नवरात्रात कोरोनाचे सावट होते. यंदा रास दांडिया, नवरात्रीची धूम असून धार्मिक, पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. प्रशासनाच्या वतीने नऊ दिवसांमध्ये धार्मिक विधी, पारायण, भजन, कीर्तन व आरती आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आश्विन शुद्ध महानवमीस (ता.०४) पहाटे देवीची विशेष आरती झाल्यावर होमाचा कार्यक्रम होणार आहे. रायवूड येथे असंघटित कामगार संघटना व माजी नगराध्यक्ष अमित गवळी यांच्या वतीने रायवूड येथे नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आली आहे. याचबरोबर तुंगार्ली येथे जाखमाता देवी, नांगरगाव येथे नांगराई देवी, लोणावळ्यात शितळामाता देवीच्या उत्सवाबरोबर विविध मंडळांच्या वतीने रास दांडीयाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
खंडाळ्यात सांस्कृतिक कार्यक्रम
कोकणासह मावळातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या घाटमाथ्यावर वसलेल्या खंडाळ्यातील वाघजाईच्या दर्शनासाठी नवरात्रात भाविकांची मोठी गर्दी होत असते. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधत श्री वाघजाई देवस्थान व नवरात्र उत्सव समितीच्या वतीने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खंडाळा गावठाण ते वाघजाई मंदिर अशी देवीच्या प्रतिमेची छबिना मिरवणूक व घटाची पालखी निघणार आहे. देवस्थानच्या वतीने येथील क्रीडापटू तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. होमहवन, दसऱ्यास (ता. ५) रोजी शमीपूजन तसेच छबिना मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
छायाचित्र: LON22B02037 (एकवीरा देवी)