
कार्ल्यात पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीतर्फे ‘पर्यटक सप्ताह’व
लोणावळा, ता. २७ : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत एमटीडीसीच्या वतीने पर्यटक निवासामध्ये २३ ते २९ सप्टेंबर २०२२ पर्यंत ‘पर्यटन सप्ताह’ साजरा करण्यात येत असून ‘जबाबदार पर्यटन’ ही संकल्पना राबविण्यात येत असल्याची माहिती कार्ला पर्यटक निवास व्यवस्थापक सुहास पारखी यांनी दिली.
पर्यटन सप्ताहाचे औचित्य साधत पर्यटन महामंडळाच्या वतीने राज्यभरातील पर्यटक निवासामध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. या मध्ये जबाबदार पर्यटन, जंगल ट्रेल, नेचर वॉक, मराठी खाद्यपदार्थ संस्कृती, रानभाज्या महोत्सव, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण कार्यक्रमांसह कार्ला लेणी व लोणावळा पर्यटन नगरीत पर्यटकांचे स्वागत आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे निवास व्यवस्थापक सुहास पारखी म्हणाले. पर्यटन सप्ताह अंतर्गत व्हीपीएस ज्यू कॉलेज लोणावळा येथील विद्यार्थ्यांना जबाबदार पर्यटन व पर्यटनातील रोजगाराच्या संधी याविषयी इतिहास अभ्यासक व जुन्नर येथील स्वराज्य पर्यटन संस्थेचे संस्थापक विजय कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना व पर्यटन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. एमटीडीसी कार्लाचे व्यवस्थापक सुहास पारखी, संदेश जुंदरे, नीलम प्रसाद, प्रशालेचे प्राचार्य रामदास दरेकर उपस्थित होते. कार्ला येथील एकवीरा विद्या मंदिरात पर्यटन महामंडळाकडून चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास एमटीडीसीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन नगरी लोणावळा येथे आलेल्या पर्यटकांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.