इंडियन स्वच्छता लीगमध्ये लोणावळा नगर परिषद अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंडियन स्वच्छता लीगमध्ये 
लोणावळा नगर परिषद अव्वल
इंडियन स्वच्छता लीगमध्ये लोणावळा नगर परिषद अव्वल

इंडियन स्वच्छता लीगमध्ये लोणावळा नगर परिषद अव्वल

sakal_logo
By

लोणावळा, ता. १ : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आयोजित ‘इंडियन स्वच्छता लीग-२०२२’ मध्ये लोणावळा नगर परिषद अव्वल ठरली आहे. ५० हजार ते एक लाख लोकसंख्या असलेल्या देशातील एकूण १८५० शहरातून लोणावळ्याने अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचे नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे वितरण झाले.
केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री कौशल किशोर कौशल किशोर, स्वच्छ भारत मिशनच्या सचिव रूपा मिश्रा, उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव निकुंज श्रीवास्तव व अमृत अभिजात यांच्या हस्ते इंडियन स्वच्छता लीग २०२२ अव्वल क्रमांकाचा पुरस्कार लोणावळा नगर परिषदेच्या वतीने नगर अभियंता वैशाली मठपती, यशवंत मुंडे, दत्तात्रेय सुतार, विजय लोणकर, शहर समन्वयक अक्षय पाटील यांनी स्वीकारला. गेली चार वर्षे स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये नावलौकीक मिळविणाऱ्या लोणावळा नगर परिषदेचा क्रमांक यंदा हुकला असला तरी स्वच्छता लीग उपक्रमात यश मिळविल्याने समाधान व्यक्त होत आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ ७५ व्या स्वांतत्र्य महोत्सवानिमित्त १७ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर राष्ट्र नेता ते राष्ट्र पिता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. पर्यटनस्थळांसाठी इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन केले होते. लोणावळा नगरपरिषद ही ‘लोणावळा स्वच्छाग्रही’ म्हणून लीगमध्ये सहभागी झाले होते. टीम कॅप्टन मुख्याधिकारी पंडित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा नगरपरिषदेने खंडाळा व भुशी या पर्यटन स्थळांवर स्वच्छता मोहीम, पथ नाट्य, प्लॉग अ थॉन आदी कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. ब्रँड अँबेसिडर आयेशा झुल्का, माजी नगरसेवक, सर्व शाळा, सामाजिक संस्था, व नागरिक हे मोठ्या प्रमाणाने उपस्थित होते. या सर्वांच्या एकत्र प्रयत्नामुळेच हा लीग पुरस्कार मिळाला, असे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी सांगितले.

छायाचित्र: ९५९९४