दिवाळी सुट्ट्यांमुळे द्रुतगतीवर वाहनांच्या रांगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी सुट्ट्यांमुळे द्रुतगतीवर वाहनांच्या रांगा
दिवाळी सुट्ट्यांमुळे द्रुतगतीवर वाहनांच्या रांगा

दिवाळी सुट्ट्यांमुळे द्रुतगतीवर वाहनांच्या रांगा

sakal_logo
By

लोणावळा, ता.२२ : दिवाळी सुट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठ्या संख्येने वाहने आल्याने बोरघाटात वाहनांच्या रांगा लागल्या. तेथील वाहतूक संथगतीने सुरु आहे. या मार्गावर शुक्रवारीही वाहतुकीची कोंडी पाहण्यास मिळाली होती. त्यामुळे, इच्छितस्थळी पोचण्यासाठी विलंब होऊन वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
दिवाळी सुट्यांमुळे आपापल्या गावी जाण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक, पर्यटक यांची महामार्गावर वाढली आहे. तशातच बोरघाटात सुरू असलेले रस्ता रुंदीकरण व मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम आणि मार्गात अवजड वाहने बंद पडत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे शनिवारी (ता.२२) पहाटेपासूनच द्रुतगतीवर वाहतुकीची कोंडी अनुभवण्यास मिळाली.
बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ शुक्रवारी सकाळी एक अवजड वाहन बंद पडल्याने खंडाळा एक्झिटपर्यंत मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांब रांगा लागल्या. तर दुसरीकडे खोपोली हद्दीत खोपोली एक्झिट, बोरघाटात आडोशीजवळ मिसिंग लिंक प्रकल्पासह रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र आहे. कुणे नामा, दस्तुरी, अंडा पॉईंट येथेही वाहतुकीची कोंडी झाली. ऐन सणासुदीला पुणे, लोणावळा, महाबळेश्वर, सातारा, कोल्हापूर, सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनचालकांना ट्रॅफिक जॅमचा चांगलाच तडाखा बसण्याची चिन्हे आहे.

लोणावळ्यात अद्याप वर्दळ नाही
पर्यटननगरी असा लौकिक असलेल्या लोणावळा-खंडाळ्यात दिवाळीनिमित्त सध्या पर्यटकांची फारशी वर्दळ दिसत नाहीय. मात्र, भाऊबीजेनंतर गर्दी होण्याची शक्यता येथील हॉटेल व्यावसायिक अतुल जोशी यांनी व्यक्त केली.
लोणावळा-खंडाळा ही ठिकाणे पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्रे असल्याने पर्यटक लोणावळा परिसरातील भुशी डॅम, राजमाची, लोहगड, एकवीरा-भाजे लेणी परिसर, पवना धरण परिसरात सर्व मोसमामध्ये गर्दी करत असतात. पर्यटकांचे सर्वाधिक पसंती असलेल्या लायन्स पॉइंट, खंडाळ्यातील राजमाची उद्यान, सनसेट पॉइंट येथेही पर्यटकांची पंसती मिळते.

परराज्यातील सहली फुल्ल, राजस्थान, केरळ, गोव्यास पसंती
दिवाळीनंतरच्या सुट्यांसाठी परराज्यातील सहली फुल्ल झाल्या असून राजस्थान, केरळ, हैद्राबाद, गोव्यास पसंती मिळत असल्याची माहिती व्यावसायिक समीर इंगळे यांनी दिली. दिवाळीनंतरचे लोणावळ्यातील हॉटेलांचे जवळपास सरासरी पन्नास टक्के बुकिंग झाले असल्याचे इंगळे म्हणाले.