कोकणातील दिंड्यांनी गजबजला मावळ परिसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणातील दिंड्यांनी 
गजबजला मावळ परिसर
कोकणातील दिंड्यांनी गजबजला मावळ परिसर

कोकणातील दिंड्यांनी गजबजला मावळ परिसर

sakal_logo
By

लोणावळा, ता. १५ : गळ्यात तुळशीच्या माळ, कपाळावर अष्टगंध-अबिराचा टिळा आणि खांद्यावर भगवी पताका घेत ज्ञानोबा, तुकारामांचा जयघोष करीत कार्तिकी वारीला आळंदीला निघालेल्या कोकणातील दिंड्यांनी मावळ परिसर दुमदुमून गेला आहे. वैष्णवांच्या मांदियाळीने मुंबई-पुणे महामार्ग गजबजून गेला आहे.
कोरोनाचा प्रभाव संकट कमी झाल्यामुळे यंदा कार्तिकी यात्रा मोठ्या थाटात होत आहे. पंढरपूर कार्तिकी वारीनंतर वारकऱ्यांना आळंदी यात्रेचे वेध लागतात. यादरम्यान राज्यभरातून दिंड्या आळंदीत दाखल होत असतात. कोरोनानंतर भरत असलेल्या वारीमुळे वारकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. विशेषतः घाटाखालून कोंकण, ठाणे, मुंबई परिसरातून दिंड्याचे मावळ तालुक्यात आगमन होत आहे. ज्ञानोबा-तुकाराम अशा जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले आहे. मावळत जागोजागी दिंड्याचे उत्साहात स्वागत करण्यात येत असून, आदरातिथ्य करण्यात येत आहे.

लोणावळा-देहूफाटा दरम्यान वाहतूक वळवावी
महामार्गावर दिंड्याना संरक्षण देण्याची मागणी मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. आळंदी यात्रा काळात दिंडी, पालखी मार्गावरील लोणावळा-देहूफाटा दरम्यान वाहतूक १५ ते २० नोव्हेंबर या कालावधीत द्रुतगती मार्गावरुन वळविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी आळंदी यात्रेनिमित्त कोकणातील उंबरे येथून निघालेल्या माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्टच्या दिंडीत टें घुसल्याने झालेल्या अपघातात पाच महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर २२ वारकरी जखमी झाले होते. अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात यावी तसेच पालखी मार्गावर रुग्णवाहिका उपलब्ध असाव्यात, अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात आली आहे.

छायाचित्रे: LON22B02164/02161/02162