महाविकास आघाडी कडून राज्यातील वातावरण गढूळ करायचे उद्योग सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pravin Darekar
महाविकास आघाडी कडून राज्यातील वातावरण गढूळ करायचे उद्योग सुरू- प्रवीण दरेकर

Pravin Darekar : महाविकास आघाडी कडून राज्यातील वातावरण गढूळ करायचे उद्योग सुरू

लोणावळा - गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील शिंदे सरकार महाराष्ट्राला विकासाकडे नेत आहे. मात्र, विरोधकांकडे बोलण्यासाठी काहीही नसल्याने भावनिक मुद्दे उपस्थित करून, राज्यातील वातावरण गढूळ करायचा उद्योग महाविकास आघाडीकडून सुरू आहे, अशी टीका विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी लोणावळ्यात केले.

शिवक्रांती कामगार संघटनेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कामगार मेळाव्यास दरेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात दरेकर म्हणाले, ‘‘अशा प्रकारच्या वक्तव्यांचे कोणी समर्थन करणार नाही. परंतु कोणीही त्याचा विपर्यास करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये.’’ शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस ॲड. विजयराव पाळेकर, भाजपाचे पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, माजी नगरसेविका वृंदा गणात्रा, वरिष्ठ चिटणीस गुलाब मराठे, खजिनदार रविंद्र साठे, सिमा पाळेकर, नरेश खोंडगे, प्रतिक पाळेकर, प्रथमेश पाळेकर आदींसह संघटनेचे संघटक व विविध कंपनी व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी व मोठ्या संख्येने कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

दरेकर म्हणाले, ‘शेतकरी व कामगार दोन्ही घटक जर ताकदवान असतील तर देशाचा विकास, देशाचा गाडा चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाचे नेतृत्व घेतल्यानंतर कष्टकरी वर्गाकडे लक्ष घातलं, गरीब कल्याणाच्या अनेक योजना आणल्या, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला सहा हजार टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय आहे.’

कामगार, कर्मचारी ज्या वेळेला निवृत्त होतो. त्यावेळी त्याच्यासुद्धा भविष्याची व्यवस्था करणारी योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारला करता येते काय, यासाठी प्रयत्न करू. निवृत्तीच्या काळात ज्या विवंचना आमच्या कामगारांना असतात, त्यासुद्धा सोडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस सरकार करेल आणि त्यासाठी मी पुढाकार घेईल, असे दरेकर यांनी नमूद केले.

शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस विजयराव पाळेकर म्हणाले, ‘अनेक बाजारु कामगार संघटना महाराष्ट्रात आल्या व गेल्या. २५ वर्ष टिकली ती शिवक्रांती कामगार संघटना आहे. कामगार आणि व्यवस्थापन यांचा समन्वय आणि विश्वासावर वाटचाल सुरू आहे, असे पाळेकर म्हणाले. तळेगाव येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीचे कामगार गेली आठ वर्षे लढा देत आहेत, त्यांची परिस्थिती हलाखीची झाली असून, त्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा अविनाश बवरे यांनी व्यक्त केली.