
लोणावळ्यातील आठवडे बाजारप्रश्नी माजी सभापती आक्रमक
लोणावळा, ता. २२ : लोणावळ्यात शुक्रवारी भरणाऱ्या आठवडे बाजारप्रश्नी माजी आरोग्य समिती सभापती व नगरसेविका वृंदा गणात्रा यांनी आक्रमक भूमिका घेतली असून बाजाराचे सुनियोजन करावे व कायदा आणि सुव्यवस्थेसह महिलांची सुरक्षा राखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गणात्रा यांनी केली आहे. आठवडे बाजार भरत असलेला रस्ता अरुंद असून त्यामध्ये अनेक खासगी वाहने भर बाजाराच्या दिवशी बाजारातून प्रवेश करत असतात. त्यामुळे व्यापारी तसेच नागरिकांमध्ये वाहतूक कोंडीमुळे अनेकदा वाद होतात. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात यावी. आठवडे बाजारामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गर्दीचा फायदा घेऊन अनेक समाजकंटक, टवाळखोर महिलांशी गैरवर्तन, अश्लील भाषेचा वापर करत टोळकी फिरत असतात. हे गैरप्रकार रोखण्यासाठी अतिरिक्त पोलिस कर्मचाऱ्यांसह महिला पोलिस कर्मचारी नेमावेत, अशीही मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.
आठवडे बाजाराशी जोडणारा भोंडे शाळेजवळील रस्त्याची दुरवस्था झाली असून नागरिकांना बाजारात येण्या-जाण्यास अडचणीचे ठरत आहे, रस्त्याची तत्काळ डागडुजी करून नागरिकांची गैरसोय टाळावी. कोरोना काळापासून स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी भाजी विक्रेते झाले असून परिणामी आठवडे बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. असे असताना नगरपालिकेकडून ५० रुपयांवरून २०० रुपये फी आकारण्यात येत आहे. ती शेतकरी तसेच स्थानिक विक्रेत्यांसाठी अन्यायकारक ठरत असून त्यावर फेरविचार करून कमी करत गोरगरीब व्यावसायिकांना न्याय देण्यात यावा. आठवडे बाजार सुनियोजित नसल्याने स्थानिक नागरिक विशेष करून महिला, ज्येष्ठ नागरिक यांना खरेदी करताना अडचणी येत आहेत तरी यामध्ये नगरपालिका व पोलिस प्रशासनाने लक्ष देऊन बाजाराचे योग्य नियोजन करावे, असे गणात्रा म्हणाल्या.