
लोणावळ्यात पर्यटकांना मास्क वापरण्याचे आवाहन
लोणावळा,ता.२३: कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात पर्यटकांना मास्क वापरण्याचे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी केले आहे. पाटील म्हणाले, ‘‘लोणावळा हे पर्यटनस्थळ असल्याने येथे हजारो पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंग पाळावे आणि मास्कचा वापर करावा. हॉटेल चालकांनी देखील पर्यटकांना मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याची सक्ती करावी’’. चीन, अमेरिका या देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या बातम्या येत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात खबरदारी घेण्यास सुरवात झाली आहे. केंद्र सरकारच्यावतीने देखील नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. पर्यटननगरी लोणावळा-खंडाळ्यात नाताळ आणि नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तसेच कोरोनाचा धोका रोखण्यासाठी लोणावळा नगरपरिषद सज्ज झाली आहे.