
लोणावळ्यात दरोडेखोरांचा चोरीचा प्रयत्न फसला
लोणावळा, ता. २८: सह्याद्री नगर, हुडको कॉलनीतील नागरिकांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान चोरटे आणि स्थानिकांमध्ये उडालेल्या चकमकीत दोन युवक जखमी झाले. लोणावळ्यात चोरट्यांचे धाडस वाढत असून मध्यवस्तीत चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी (ता.२६) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वृषाली हनुमंत राऊत (वय-३४, रा. पसायदान, सह्याद्री नगर, हुडको कॉलनी, लोणावळा) यांनी फिर्याद दिली. लोणावळा शहर पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरटे आणि स्थानिक नागरिक यांच्यातील थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हुडकोतील एका घरात अज्ञात चोरट्यांनी दरवाजा तोडून चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला. घरातील साहित्य विस्कटून शोधाशोध केली. स्थानिक नागरिकांना याबाबत कुणकूण लागताच पाच-सहा स्थानिक नागरिक गोळा होत त्यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला. मात्र चोरट्यांकडे हत्यारे असल्याने त्यांचा प्रयत्न असफल झाला. चोरट्यांनी त्यांच्या हातात असलेल्या कॅटीमधूम मारलेल्या गोट्यांमुळे दोन युवक किरकोळ जखमी झाले. तीनही चोरटे दुचाकीवरून पलायन केले. करण्यात यशस्वी झाले. हा सर्व प्रकार घडल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गेल्याकाही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांचा धाक कमी झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.